महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतुकीमध्ये बदल
By राम शिनगारे | Published: February 15, 2023 09:10 PM2023-02-15T21:10:26+5:302023-02-15T21:10:39+5:30
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात.
औरंगाबाद : देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने मोठी यात्रा भरते. त्यामुळे १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह इतर ठिकाणची जड वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. घृष्णेश्वर मंदिर, तीर्थकुंड, वेरूळ लेणी राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते. हा रस्ताही घाट रस्ता असल्यामुळे यात्रेदरम्यान वाहनांची काेंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ फेब्रुवारी रोजी १० वाजेपासून २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत औरंगाबाद-दौलताबादमार्गे वेरूळ-कन्नडकडे जाणारी जड वाहतूक ही दौलताबाद टी-पॉइंट (शरणापूर फाटा) येथून कसाबखेडा-वेरूळमार्गे कन्नडकडे जाईल.
वेरूळ-खुलताबाद-दौलताबादमार्गे औरंगाबादकडे येणारी जड वाहतूक वेरूळ-कसाबखेडा-दौलताबाद टी-पॉइंटमार्गे औरंगाबादेत येईल. फुलंब्री-खुलताबाद-वेरूळमार्गे जाणारी जड वाहतूक फुलंब्री-औरंगाबाद-नगरनाका-दौलताबाद टी-पॉइंट-कसाबखेडा-वेरूळमार्गे कन्नडकडे जाईल. वेरूळ-खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील जड वाहतूक वेरूळ-कसाबखेडा-दौलताबाद टी-पॉइंटमार्गे औरंगाबादकडे जाईल, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.