नियमांत बदल, बँकेतील लॉकर्सचा करार अपडेट केला का ?
By प्रशांत तेलवाडकर | Published: January 1, 2024 07:44 PM2024-01-01T19:44:30+5:302024-01-01T19:44:38+5:30
लॉकरला मागील ३ वर्षांत मोठी मागणी वाढली आहे, शहरात २२९ बँकांचे ३९ हजार लॉकर्स
छत्रपती संभाजीनगर : मागील तीन वर्षांत चोरट्यांनी शहरातील ४२४ घरे फोडली. यामुळे सोन्या-चांदीचे दागिने असोत की महत्त्वाचे दस्तऐवज; ते घरात न ठेवता शहरवासीय बँकेतील लॉकर्समध्ये ठेवणे पसंत करीत आहेत. यामुळे शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांतील ३९ हजारांपैकी बहुतांश लॉकर्स बुक झाले आहेत. नवीन लॉकर्स पाहिजे असल्यास ‘वेटिंग’ करावी लागत आहे. १ जानेवारीपासून बँक लॉकर्सच्या नियमात बदल होणार आहेत. ८० टक्के लॉकरधारकांनी नवीन करारावर स्वाक्षरी केली आहे.
शहरात ३९ हजार लाॅकर्स
आजघडीला शहरात २२९ बँकांच्या ४९१ शाखा आहेत. काही शाखांमध्ये लाॅकर्सची व्यवस्था नाही. जिल्हा अग्रणी बँकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार शहरातील बँकांमध्ये ३९ हजार लॉकर्स आहेत.
१० टक्के लॉकर्सचे नवीन करार, नूतनीकरण झालेच नाही
१ जानेवारी २०२४ पासून बँकेच्या लॉकर्सच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यासाठी लॉकर्सची नूतनीकरण प्रक्रिया डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. विविध बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८० टक्के लॉकरधारकांनी नवीन कराराचे नूतनीकरण केले आहे. बाकीचे बहुतेकजण येत्या आठवडाभरात करतील, असे सांगण्यात आले.
जिल्ह्यात बँकांच्या शाखा
बँक--- संख्या---- शाखा
१) राष्ट्रीयीकृत १२---- १९७
२) खासगी १६--- ९३
३) स्मॉल फायनान्स बँक ०८---२५
४) पेमेंट बँक ०१--०१
५) महाराष्ट्र ग्रामीण बँक-- ०१---३७
६) डीसीसी बँक ०१---१३८
नवीन कराराचे ९८ टक्के नूतनीकरण
लॉकरला मागील ३ वर्षांत मोठी मागणी वाढली आहे. आमच्याकडे ५८०० लॉकर्स असून, मोठे-मध्यम व लहान आकारातील बहुतांश लॉकर्स बुक आहेत. अनेक शाखेत नवीन लॉकरसाठी ३ ते ६ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. ९८.५० टक्के लाॅकरधारकांनी नवीन कराराचे नूतनीकरण केले आहे.
-प्रवीण नांदेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी बँक
१ हजार लाॅकर, वेटिंग सुद्धा
लॉकर्सचे नवीन नूतनीकरण करार करण्यासाठी मुदत वाढविण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून काही नवीन आदेश आले नाहीत. सेंट्रल बँककडे १ हजार लॉकर्स असून, त्यातही वेटिंग सुरू आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक लाॅकरधारकांनी नूतनीकरण केले आहे.
-हेमंत जामखेडकर, कोषाध्यक्ष, एआयसीबीईएफ
...तर लॉकरधारकांना नुकसानभरपाई
बँकेवर दरोडा पडला किंवा लॉकर्समधून काही गहाळ झाले, बँकेला आग लागली, तर अशा परिस्थितीत लॉकरधारकांना नुकसानभरपाई देणे संबंधित बँकेला बंधनकारक आहे. यामुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणखी वाढला आहे.
-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक