बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 01:22 PM2022-09-03T13:22:01+5:302022-09-03T13:29:15+5:30
भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने सगळ्याच मतदारसंघांत सशक्त बुथ अभियान सुरू केले आहे.
औरंगाबाद : पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने बुथनिहाय बांधणी जोमाने सुरू केली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका न झाल्यास व विद्यमान सरकारने कार्यकाळ पूर्ण केल्यास २०२४ साली विधानसभा निवडणुका होतील. परंतु जर - तरच्या राजकारणाचा विचार करता भाजपने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत स्वबळावर तयारी सुरू केली असून, पश्चिम मतदारसंघात माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी सोशल मीडियातून बुथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा घेतल्याचे छायाचित्र व्हायरल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व आ. संजय शिरसाट करीत असून, ते सध्या शिंदे गटात आहेत. राज्यात शिंदे गट व भाजपची युती आहे. असे असले तरी भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने सगळ्याच मतदारसंघांत सशक्त बुथ अभियान सुरू केले आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकांमध्ये भाजप व शिंदे गट युती करतील की नाही, यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी शिवसेना - भाजप युती असताना बंडखोरी करीत निवडणूक लढविली होती. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, शिवसेना, भाजप बंडखोर अशा चौरंगी लढतीत आ. शिरसाट यांचा विजय झाला होता. गेल्या निवडणुकीत शिंदे भाजपच्या चिन्हावर लढले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते, असेही बोलले गेले.
पश्चिम मतदारसंघात भाजपला अस्तित्व निर्माण करायचे असल्यामुळेच आ. शिरसाट यांना मंत्रिमंडळात घेतले नसल्याचीदेखील चर्चा आहे. या चर्चेत तथ्य असेल तर आगामी काळात अनेक कुरघोड्यांचे राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेनेही पश्चिमसह जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत बांधणी सुरू केली आहे. पश्चिम मतदारसंघात तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांना पक्षाने बळ दिले असून, ते शिरसाट यांच्याविरोधात आगामी काळात आव्हान उभे करतील, असे बोलले जात आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही ताकद पणाला लावतील. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर शिवसेनेत सर्वाधिक फूट पश्चिम मतदारसंघातच पडली आहे. भाजपने शिंदे यांच्यासह जिल्ह्यात विद्यमान व इच्छुकांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आ. शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदारांना आगामी निवडणुका लढण्याबाबत खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.