निरोगी जीवनासाठी जप मौखिक आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:43 AM2017-08-01T00:43:03+5:302017-08-01T00:43:03+5:30
निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपण्याचे आव्हान तज्ज्ञांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : धावपळीच्या युगात फास्टफूडच्या आहारामध्ये वाढता समावेश आणि मौखिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. एकट्या हिरड्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने अल्झायमर, हृदय, किडनी विकाराला सामोरे जावे लागते. हिरड्यांचे आजार गर्भपातालाही कारणीभूत ठरते. त्यामुळे निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपण्याचे आव्हान तज्ज्ञांनी केले आहे.
भारतीय दंतपरिवेष्टनशास्त्र परिषदेतर्फे १ आॅगस्ट हा दिवस मौखिक स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मौखिक स्वच्छता म्हणजे दात, हिरड्या, जीभ, टाळू व गालाच्या आतील भागांची स्वच्छता होय.
यामध्ये प्लाक, अन्नकन यापासून तोंडाची मुक्तता करणे महत्त्वाचे ठरते. मौखिक स्वच्छता न राखल्यास हिरड्यांचे आजार, दंतक्षय, मुखदुर्गंधी अशा आजारांना सामोरे जावे लागते.
हिरड्यांचे आजार आणि शारीरिक आजार यांचा जवळचा संबंध आहे. हिरड्यांच्या आजारामुळे गर्भपात होणे, कमी वजनाचे बाळ जन्मणे, शारीरिक व्यंग आढळण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.
हिरड्यांच्या आजारात रासायनिक पदार्थ तयार होतो आणि तो रक्ताद्वारे गर्भाशयात पोहोचतो. त्यातून हे प्रश्न उद््भवतात, असे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंतपरिवेष्टनशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया इंदूरकर यांनी सांगितले.