दंगलीतील कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी ठाण्यात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:04 AM2021-06-01T04:04:36+5:302021-06-01T04:04:36+5:30
याबाबतची माहिती मिळताच २० मे २०१८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आ. प्रदीप जैस्वाल क्रांती चौक पोलीस ठाण्यात ...
याबाबतची माहिती मिळताच २० मे २०१८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आ. प्रदीप जैस्वाल क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेले. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून हवालदार चंद्रकांत पोटे खुर्चीवर बसलेले होते. गांधीनगर येथील आरोपींना जामिनावर सोडा, असे जैस्वाल म्हणाले. आरोपींना अटक करणारे सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल आहेत. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतो, असे पोहेकॉ. पोटे यांनी सांगितले.
सपोनि. शेख हे लगेच ठाण्यात आले. तेव्हा त्यांनी जैस्वाल यांना सांगितले की, या आरोपींना ठाण्यात जामीन देता येणार नाही. न्यायालयाकडून त्यांचा जामीन घ्यावा लागेल. याचा राग आल्याने जैस्वाल यांनी पोटे यांना, ‘तुम्ही तुमचे काम बंद करा, आताच्या आता तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना बोलवा, तुम्ही पोलीसवाले शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक करीत आहेत. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या पक्षालाच त्रास देत आहेत’, असे म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केली.
त्याचवेळी त्यांनी पेन स्टॅण्ड टेबलवर आदळून काच फोडली. यावेळी त्यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्त्यांनी आणि सहायक निरीक्षक विजय घेरडे यांनी जैस्वाल यांना समजावून सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना घरी नेले.
याप्रकरणी पोहेकॉ. पोटे यांनी जैस्वाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता. त्यावेळी त्यांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना जामीन नाकारत त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली होती.
फौजदार अजय सूर्यवंशी यांनी जैस्वाल यांना अटक केली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.