२९० शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी
By Admin | Published: February 17, 2016 11:09 PM2016-02-17T23:09:06+5:302016-02-17T23:14:42+5:30
परभणी : चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या २९० शिक्षकांच्या प्रस्तावांना १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली
परभणी : तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या २९० शिक्षकांच्या प्रस्तावांना १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली़
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना १२ वर्षांच्या सेवेनंतर चटोपाध्याय ही वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली जाते़ परभणी जिल्ह्यात यासाठी २९० शिक्षक पात्र होते़ हे प्रकरण मागील काही महिन्यांपासून प्रलंबित होते़ १७ फेब्रुवारी रोजी चटोपाध्याय मूल्यमापन समितीची बैठक घेऊन जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली़ बैठकीस सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी बी़ आऱ कुंडगीर, सदस्य शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची उपस्थिती होती़ तसेच शिक्षण विभागातील पी़एस़ ढवळे, के़ ए़ हासे, बी़ बी़ स्वामी, उमेश गायकवाड, वाघमारे, मंगेश नरवाडे, उपशिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आदींनी या कामी प्रयत्न केले़ दरम्यान या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. (प्रतिनिधी)