प्रभारी बीडीओ दोन वेळा बदलले
By Admin | Published: June 13, 2014 12:10 AM2014-06-13T00:10:01+5:302014-06-13T00:39:21+5:30
औंढा नागनाथ: येथील पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळत नसल्याने विकासकामे मंदावली आहेत.
औंढा नागनाथ: येथील पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळत नसल्याने विकासकामे मंदावली आहेत. विशेष म्हणजे एका महिन्यात दोनवेळा प्रभारी बीडीओ बदलल्यानंतर आता पं. स. चा कारभार पाहण्यासाठी कळमनुरी येथील सीडीपीओ (एकात्मिक प्रकल्प विकास अधिकारी) दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे बीडीओचा पदभार देण्यात आला आहे.
औंढा नागनाथ येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून डॉ. सुनील भोकरे यांनी काही वर्षे काम केले. त्यांच्यानंतर पं. स.चा कारभार चालविण्यासाठी जि. प. प्रशासनाने एकाच महिन्यात दोन वेळा प्रभारी बीडीओ देण्याची किमया केली आहे. सध्या या पं. स. चा कारभार व्यवस्थित करण्यासाठी कळमनुरी येथील सीडीपीओ पदावर कार्यरत असलेले प्रकाश जोंधळे यांच्याकडे प्रभारी बीडीओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे; परंतु शासनाच्या नवीन धोरणानुसार ‘सीडीपीओ’ला पं.स. कार्यालयात सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार जोंधळे यांची सध्या कळमनुरी पं. स. मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारीपदी नेमणूक झाली आहे. त्या अगोदरच औंढा पंचायत समितीला सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पंडित रुजू झाले होते; परंतु जि. प. प्रशासनाने पंडित यांच्याकडे बीडीओचा पदभार न देता जोंधळे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.
सध्या जोंधळे यांच्याकडे कळमनुरी मधील पं. स. चा सहाय्यक गटविकास अधिकारी, सीडीपीओ व औंढा येथील बीडीओ या तीन ठिकाणची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना औंढा पं. स. कार्यालयात वेळ देता येत नसल्याने पं. स. अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची गती मंदावली आहे. त्याच प्रमाणे रोजगार हमी योजनेच्या कामांची अनेक ठिकाणावरील मजुरांकडून मागणी होती; परंतु बीडीओकडे वेळच नसल्याने सदरील कामे पुढे ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच प्रमाणे सिंचन विहिरी, पांदण रस्ते, बीआरजीएफ, घरकुल योजना लाभार्थ्यांची देयके रुकल्यामुळे कामे थांबली आहेत. त्यामुळे औंढा पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बीडीओंचा पदभार देण्यात यावा किंवा कायमस्वरुपी बीडीओ नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून करण्यात आली आहे. (वार्ताहर)
विकासकामे मंदावली
औंढा नागनाथ येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून डॉ. सुनील भोकरे यांनी काही वर्षे काम केले. त्यांची बदली झाली आहे.
पंचायत समितीचा कारभार चालविण्यासाठी जि.प. प्रशासनाने एकाच महिन्यात दोन वेळा प्रभारी बीडीओ देण्याची किमया केली आहे.
कळमनुरी येथील सीडीपीओ पदावर कार्यरत असलेले प्रकाश जोंधळे यांच्याकडे प्रभारी बीडीओची जबाबदारी देण्यात आली आहे.
सध्या जोंधळे यांच्याकडे कळमनुरी मधील पं. स. चा सहाय्यक गटविकास अधिकारी, सीडीपीओ व औंढा येथील बीडीओ या तीन ठिकाणची जबाबदारी आहे.
प्रभारी बीडीओंना कार्यालयात वेळ देता येत नसल्याने पं. स. अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची गती मंदावली आहे.
औंढा तालुक्यातील सिंचन विहिरी, पांदण रस्ते, बीआरजीएफ, घरकुल योजना लाभार्थ्यांची देयके रुकल्यामुळे कामे थांबली आहेत.
पुर्णवेळ अधिकाऱ्याची मागणी