प्रभारींवर चालतोय मनपाचा कारभार !
By Admin | Published: July 18, 2016 12:54 AM2016-07-18T00:54:43+5:302016-07-18T01:09:21+5:30
लातूर : लातर महानगर पालिकेतील रिक्त असलेल्या जागेवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्यामुळे सध्या मनपातील कारभार प्रभारींवरच हाकला जात आहे.
लातूर : लातर महानगर पालिकेतील रिक्त असलेल्या जागेवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्यामुळे सध्या मनपातील कारभार प्रभारींवरच हाकला जात आहे. विशेष म्हणजे महत्वाच्या अधिकाऱ्यांची पदेही सध्या रिक्त आहेत. याठिकाणी वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रिक्त पदांवर मनपा ‘प्रभारी राज’ सुरु आहे.
लातूर महानगर पालिका अस्तित्वात आल्यानंतर महत्वाच्या पदासाठी राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता यातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यामुळे ही महत्वाची पदे रिक्त आहेत.या पदांचा पदभार मनपातील वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. प्रभारी पदावर मनपाचा पदभार हाकला जात असून, एका कर्मचाऱ्याकडे किमान तीन विभागाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे प्रशासनातील गोंधळ वाढला आहे. नगर अभियंतापद महत्वाचे असताना टंचाई काळातच हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून हे पद न भरल्यामुळे टंचाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. सहाय्यक आयुक्तांची एकूण ६ पदे मंजूर असून एका सहआयुक्तावर कारभार सुरु आहे. उपायुक्त यांचे दोन पदे मंजूर असताना एकच अधिकारी आहे़ नगर अभियंता, विद्युत विभाग प्रमुख हे प्रभारीच आहेत. तर प्रभाग अधिकारी यांची ६ पदे मंजूर असतानाही एकाच अधिकाऱ्यावर कारभार चालविला जात आहे. शहराच्या विकासासाठी महत्वाचे असणारे मनापातील नगर रचनाकार पदच सध्याला रिक्त आहे. रिक्त पदांचा आकडा मोठा असून, केवळ सोय म्हणून मनपातील वर्ग-३ च्या प्रभारी कर्मचाऱ्यांकडे देत दिवस काढण्याचा प्रकार मनापाकडून सुुरु आहे. (प्रतिनिधी)
लातूर शहरातील पाच लाख लोकांचे आरोग्य सांभाळणाऱ्या महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणाच सध्याला ‘सलाईन’वर असल्याने ढेपाळली आहे. विशेष म्हणजे कायमस्वरुपी आरोग्य अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली नसल्याने, या पदावर कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्यांवरच मनपाकडून शहराचे आरोग्य सांभाळण्याची कसरत सुरु आहे.
लातूर शहरातील नागरिकांना टंचाई काळात पाणीपुरवठ्यासाठी लागणारे कर्मचारीही इतर विभागाकडून मनापाने घेतले आहेत. सध्याला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाचे एकूण ४५ कर्मचारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. यामध्ये १० अभियंता आणि ३५ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. लातूर शहर महानगर पालिकेसाठी एकूण १ हजार २७४ पदे मंजूर असून, यातील ८८७ कर्मचारी मनपाकडे अस्थापनेवर कार्यरत असल्याची माहिती, आस्थापना विभागाचे रमाकांत पिडगे यांनी सांगितले.