रस्त्याच्या दुरावस्थेबाबत शिवसेना आमदारास सोशल मीडियातून जाब विचारला; चार जणांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 07:15 PM2021-07-17T19:15:58+5:302021-07-17T19:35:53+5:30
Shiv Sena MLA Udaysingh Rajpup News : कन्नड-चिकलठाण रस्ता दुरावस्थेमुळे तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
कन्नड ( औरंगाबाद ) : कन्नड- चिकलठाण रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओकरून युवकांनी सोशल मिडीयातून येथील शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांना जाब विचारला. मात्र, काही व्हायरल व्हिडिओ हे आमदारांची बदनामी करणारे आहेत, असा आक्षेप घेत शिवसेना विभागप्रमुख युवराज चव्हाण यांनी चार युवकांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Charges filed against four persons who asked Shiv Sena MLA Udaysingh Rajput about the poor condition of the road through social media )
कन्नड-चिकलठाण रस्ता दुरावस्थेमुळे तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. दुरुस्तीची सातत्याने मागणी करूनही याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पावसामुळे तर या रस्त्याच्या अवस्था अत्यंत खराब होऊन प्रवास करणे जीवावर बेतणारे ठरत आहे. यामुळे चिकलठाण पंचक्रोशित रस्त्याच्या कामाबाबत प्रचंड संताप आहे. या संतापाचा उद्रेक समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना दिसत आहे. यातूनच काही युवकांनी रस्त्याची दुरवस्था दाखवणारे व्हिडिओ बनवून सोशल मीडियात व्हायरल केले. या व्हिडिओतून आमदार उदयसिंग राजपूत यांची बदनामी करण्यात आली अशी तक्रार शिवसेनेचे विभागप्रमुख युवराज चव्हाण यांनी पोलिसात केली. या रस्त्याचे काम आमदार राजपूत यांच्या सूचनेनुसार मी स्वतः करून घेत आहे. या दरम्यान, युवकांचे आमदार राजपूत यांची बदनामी करणारे सोशल मिडियाचे स्टेट्स दिसले,असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावरून पोलिसांनी आकाश बोरसे, निलेश चव्हाण, प्रशांत चव्हाण व रेवणनाथ पल्हाळ ( सर्व रा चिकलठाण ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
रस्त्याचे काम तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत
चिकलठाण ते कन्नड या बारा कि.मी. रस्त्याची संपूर्णपणे वाट लागली आहे. यामुळे भोकनगाव, दाभाडी, बहिरगाव, कुंजखेडा, हिवरखेडा, वडाळी, नीमडोंगरी, ठाकूरवाडी, घुसूर तांडा या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. वीस मिनिटांचे हे अंतर कापण्यासाठी खड्डे व उखडलेल्या गिट्टीमुळे वाहनधारकांना तब्बल एक तास लागतो. येथून सतत ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांना पाठीच्या मणक्यांचा व मानेचा त्रास सुरू झाला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचून सतत अपघात होत असतात. २०१८ मध्ये मंजूर झालेले काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने ठेकेदार, सा.बां. अधिकारी आणि स्थानिक शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्यावर ग्रामस्थांचा प्रचंड रोष आहे.