औरंगाबाद हादरवणाऱ्या कशीश खून प्रकरणात दोषारोपपत्र दाखल; तांत्रिक माहितीद्वारे पुरावे सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:18 PM2022-08-25T19:18:06+5:302022-08-25T19:18:44+5:30
औरंगाबादेत गाजलेले खून प्रकरण : भक्कम पुरावे एसआयटीने केले वेळेत सादर, ४५ फोल्डर, ६५७ पानांची चार्जशीट
औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रित कौर ऊर्फ कशीशचा (वय १८, रा. उस्मानपुरा) शरणसिंग सेठीने (२०, रा. भीमपुरा, उस्मानपुरा) २१ मे रोजी दुपारी रचनाकार काॅलनीत भरदिवसा निर्घृण खून केला होता. या तपासासाठी स्थापन एसआयटीने ४५ फोल्डरचे ६५७ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
माझ्यावर प्रेम का करत नाही, म्हणून शरणसिंगने धारदार शस्त्राने तब्बल १७ वेळा वार करून कशीशची हत्या केली. वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याच्या राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, अजित दगडखैर, अंमलदार सुनील बडगुजर, वीरेश बने यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) २६ मे रोजी स्थापन केले. सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात एसआयटीने निरीक्षक आघाव आणि पातारे यांच्यासह नेतृत्वात वेगाने तपास केला. हवालदार सुनील बडगुजर व पोलीस नाईक वीरेश बने यांनी मदतनीस म्हणून काम केले. त्यानंतर दोषाराेपपत्र मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात वेळेत सादर केले.
काय आहे दोषारोपपत्रात ?
-महत्त्वाचे व प्रत्यक्षदर्शी ८१ साक्षीदारांचे जबाब
-भाैतिक पुराव्यात घटनास्थळावरील रक्त, मृत तरुणीचे कपडे, आरोपीचे कपडे
- डिजिटल व तांत्रिक पुराव्यात सीसीटीव्ही फुटेज सीडीआर, एसडीआर, टाॅवर लोकेशन
- न्यायसहाय्यक वैद्यकीय पुरावे पोस्टमार्टेम रिपोर्ट, इन्ज्युरी सर्टिफिकेट
- महत्त्वाच्या पंचनाम्यात गु्न्ह्यात वापरलेले हत्यार खंजीर, आरोपीचा मोबाईल, आरोपीचे कपडे जप्त, मेमोरंडम पंचनामा
-डिजिटल मॅप-घटनेच्या १२ किलोमीटर परिसरातील एक्सपर्टकडून तयार केलेला डिजिटल नकाशा
-आरोपी कशीशचा पाठलाग करतानाचा मार्ग दर्शविणारा नकाशा
-घटनास्थळी कशीशला खेचून नेण्याचा मार्ग दर्शविणारा नकाशा
-आरोपी खून करून पायी व त्यानंतर रिक्षाने बसून पळून जातानाचा मार्ग दर्शविणारा नकाशा,
-आरोपीने गुन्हा करून मुद्देमाल लपवून ठेवलेला मुद्देमाल दर्शविणारा नकाशा
-आरोपी, मृत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे घटनास्थळी असल्याबाबतचे सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावा अशा संपूर्ण घटनेचा डिजिटल मॅपचा यात समावेश आहे. भक्कम पुरावे हस्तगत करून मुदतीत हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.