रुग्णालयांच्या नावातून ‘धर्मादाय’ गायब; मोफत उपचारांच्या योजनेपासून गोरगरीब वंचित
By संतोष हिरेमठ | Published: May 23, 2024 06:48 PM2024-05-23T18:48:12+5:302024-05-23T18:50:06+5:30
धर्मादाय रुग्णालयांमधील प्रत्येकी १० टक्के खाटा या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात, मात्र, शहरातील ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत एकाही निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णावर उपचार केले नसल्याचे उघडकीस आले.
छत्रपती संभाजीनगर : धर्मादाय रुग्णालयांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक आहे. असे असताना त्याकडे काही रुग्णालयांनी दुर्लक्ष केले आहे. तर इमारतीवर कुठेतरी कोपऱ्यात ‘धर्मादाय’ लिहून नियमांचे पालन करीत असल्याचे काही रुग्णालये भासवत आहेत. कागदावर धर्मादाय आणि प्रत्यक्ष ‘धर्मादाय’चा उल्लेख नसलेल्या नावाचा फलक काही रुग्णालयांवर झळकत आहे.
धर्मादाय रुग्णालयांमधील प्रत्येकी १० टक्के खाटा या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात, मात्र, शहरातील ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत एकाही निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णावर उपचार केले नसल्याचे उघडकीस आले. शिवाय काही धर्मादाय रुग्णालयांमध्येही संख्या दाखविण्यापुरतेच उपचार होतात. याविषयी ‘लोकमत’ने २० मे रोजी ‘५० टक्के धर्मादाय रुग्णालयांचा गोरगरिबांना ठेंगा’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. याबरोबरच रुग्णालयांकडून ‘धर्मादाय’चा उल्लेख टाळण्याचाही प्रकाराचा समोर आला आहे.
शहरातील धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत धर्मादाय योजनेअंतर्गत किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, याची माहिती अधिकारातून विचारणा करण्यात आली. तेव्हा २२ पैकी १२ रुग्णालयांमधील रुग्णसंख्या ‘निरंक’ दाखविण्यात आली. याविषयी रुग्ण हक्क परिषदेचे जिल्हा समन्वयक कुंदन लाटे यांनी सोमवारी धर्मादायसह आयुक्तांना निवेदन देऊन गोरगरिबांवर उपचार टाळणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांची चौकशी करून कारवाईची मागणी केली.
संकेतस्थळावरही नाही
‘धर्मादाय’ माहिती अधिकारात मिळालेल्या यादीतील धर्मादाय रुग्णालयांच्या नावात धर्मादाय हा शब्द आहे. या रुग्णालयांची पाहणी केली असता यातील काही रुग्णालयांच्या नावात ‘धर्मादाय’ नसल्याचे आढळून आले. तर काहींनी ‘धर्मादाय’ शब्द कुठेतरी कोपऱ्यात लिहिल्याचे पाहायला मिळाले. अनेक रुग्णालयांनी संकेतस्थळावरही धर्मादाय असा उल्लेख केलेला नसल्याचे आढळून आले.
रुग्णांना कल्पना येणार कशी?
अनेक खासगी रुग्णालयांमधील चकचकीतपणामुळे रुग्णांना हे रुग्णालय धर्मादाय असल्याची कल्पनाच येत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात. संबंधित रुग्णालय धर्मादाय असल्याचे रुग्णांना लगेच कळावे, यासाठी या रुग्णालयांच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावणे बंधनकारक आहे. काही रुग्णालयांच्या नावामध्ये हा शब्द आहे. पण काही रुग्णालयांकडून निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
धर्मादाय रुग्णालयांची बैठक, तक्रारींचा आढावा घेऊन सूचना
गोरगरीबांवर उपचार टाळणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांची चौकशी करून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात मंगळवारी धर्मदाय रुग्णालयांची बैठक पार पडली. यावेळी रुग्णसेवेसंदर्भातील तक्रारींचा आढावा घेऊन सूचना करण्यात आल्या. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे जिल्हा समन्वयक कुंदन लाटे यांनी १२ धर्मादाय रुग्णालयांनी गोरगरीब रुग्णांना योजनेचा लाभ का दिला नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली. याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.
रुग्णांनी राहावे जागरूक
धर्मादाय रुग्णालयांमधील प्रत्येकी १० टक्के खाटा या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात. यासंदर्भात रुग्णांनी जागरूक राहून उपचाराचा हक्क घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘मनसे’ने केली समिती स्थापन करण्याची मागणी
निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर उपचार न करणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे ‘मनसे’ने धर्मादाय सहआयुक्तांकडे केली. यासाठी समिती नेमावी, रुग्णालयाच्या नावात धर्मादाय शब्द बंधनकारक करावा, अशीही मागणी केली. यावेळी ‘मनसे’चे जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार, विक्की जाधव, अभय देशपांडे, शिवा ठाकरे, रोहित जाधव, रूपेश शिंदे आदी उपस्थित होते.