जिल्हाभरात चक्का जाम

By Admin | Published: February 1, 2017 12:22 AM2017-02-01T00:22:27+5:302017-02-01T00:24:23+5:30

उस्मानाबाद : सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ४२ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़

Charka Jam on the District | जिल्हाभरात चक्का जाम

जिल्हाभरात चक्का जाम

googlenewsNext

उस्मानाबाद : सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ४२ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ या चक्काजाम आंदोलनामुळे राष्ट्रीय, राज्य महामार्गच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण मार्गावरील अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ठप्प झाली होती़ चक्का जाम आंदोलन असले तरी अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने हे आंदोलन शांततेत यशस्वी करण्यात आले़
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमी भाव द्यावा यासह इतर विविध मागण्यांसाठी ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ चक्का जाम आंदोलनासाठी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचना, लागू केलेल्या आचारसंहितांचे पालन करीत युवक-युवतींसह ज्येष्ठांनी हे चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडले़ या आंदोलनात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, शासकीय-निमशासकीय नोकरदार, व्यावसायिक, युवक-युवतींसह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते़ उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी सकाळी शहरासह परिसरातील नागरिक जमण्यास सुरूवात झाली होती़ त्यानंतर काही समाजबांधव आयुर्वेदिक महाविद्यालयाकडे तर काही जण तेरणा महाविद्यालयाकडील आंदोलनस्थळी गेले़ या दोन्ही ठिकाणच्या राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ यावेळी शहरासह परिसरातील हजारो समाजबांधव, शेतकरी, शेतमजूर, युवती, महिला उपस्थित होत्या़ सर्वत्र करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाची राष्ट्रगीताने सांगता झाली़ आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्यासह इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या़ यावेळी महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या रूग्णवाहिकांना आंदोलक वाट मोकळी करून देत होते़
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, येडशी, तेर, ढोकी, पळसप, करजखेडा इ. गावांत चक्काजाम आंदोलन करण्यात आले़ उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील चौरस्त्यावर एक तास आंदोलन करण्यात आले़ यावेळी अ‍ॅड़ धैर्यशील सस्ते, गजानन नलावडे, जयंत भोसले, श्रीमंत नवले, राजू धावने, संतोष डुमने, बालाजी चव्हाण, नाना पवार पिंटू सस्ते आदी उपस्थित होते़
ढोकी येथील पेट्रोल पंप चौकात ४० मिनिटे आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर सपोनि किशोर मानभाव, तलाठी बालाजी गरड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसरपंच अमर समुद्रे, गोवर्धनवाडीचे सरपंच विनोद थोडसरे, संग्राम देशमुख, पप्पू वाकुरे, धनंजय देशमुख यांच्यासह ढोकी व परिसरातील मराठा समाजबांधव उपस्थित होते.
उमरग्यात वाहतूक ठप्प
४उमरगा : शहरातील जकेकूर चौरस्त्यासह तालुक्यातील तुरोरी, नारंगवाडी, मुरूममोड, तलमोडसह विविध गावांमधील मुख्य मार्गावर मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामुळे काही तास वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती़ सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा स्तरावरील मराठा क्रांती मूक मोर्चा यशस्वी झाल्यानंतर उमरगा शहरात तालुक्यासह सीमावर्ती भागातील समाज बांधवांनी विराट मूक मोर्चा यशस्वी केला होता़ त्यानंतर मंगळवारी उमरगा शहरातील जकेकूर चौरस्त्यावर सकाळी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ यावेळी शहरासह तालुक्याच्या विविध भागातील पक्ष-संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते़ या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ तर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या़ तालुक्यातील मुरुम मोड, तुरोरी, तलमोड व नारंगवाडी इ. विविध ठिकाणी शांततेत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
परंड्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा
४परंडा : सकल मराठा समाजाच्या वतीने परंडा शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी सकाळी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ चक्का जाम आंदोलनामुळे आंबेडकर चौकातील प्रमुख मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ यावेळी गीतांजली मांजरे, अनुजा वारे, रोहिणी जाधव, सुलोचना फराटे, सत्यशिला महाडीक या पाच मुलींनी मराठा समाजाच्या मागण्या, प्रश्न, समाजाची स्थिती इ. विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले़ आंदोलनात ३० स्वयंसेवकांनी सहभागी आंदोलकांना मार्गदर्शन, वाहनांसाठी कोटला मैदान व पंचायत समिती मैदात स्वतंत्र पार्किंगची सोय केली़ या आंदोलनात मराठा शेतकरी, विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, मराठा व्यापारी, आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे, उप पो.नि. विशाल शहाणे, योगेश पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना मुलींच्या हस्ते देण्यात आले़ राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ आंदोलनास ह.शहीद टिपू सुलतान सामाजिक युवा मंच महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, महाराष्ट्र राज्य मुजावर संघ, राष्ट्रीय समाज पक्ष व परंडा वकील संघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
४भूम शहरातील गोलाई चौकात मंगळवारी तीन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले़ उपस्थित अनेकांनी आपले विचार मांडले़ दुपारी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांना देण्यात आले़ दुपारी एक वाजता राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता झाली़ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़
तुळजापूरकरांचा मोठा प्रतिसाद
४तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील चौकात मंगळवारी सकाळी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामुळे नळदुर्ग, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ यावेळी गोकुळ शिंदे, राजाभाऊ भोसले, महंत मावजीनाथ, जीवनराजे इंगळे, सज्जनराव साळुंके, प्रतीक रोचकरी, नागणे, गंगणे आदींनी विचार व्यक्त केले़ राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली़ पोनि राजेंद्र बोकडे, फौजदार शिंदे, दासरवाड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता़
कळंब तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन
४कळंब : शहरातील शिवाजी चौक, डिकसळ चौकासह कळंब- ढोकी राज्य मार्गावरील जवळा पाटी, भाटशिरपुरा पाटी, कळंब- येरमाळा राज्य मार्गावरील हासेगाव केज, आंदोरा या गावांसह शिराढोण, ढोकी नाका, मोहा, मंगरूळ इ. विविध गावांत ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात सहभागी नागरिकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या़ येणाऱ्या रूग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाही मार्ग मोकळा करून देण्यात आला़ इतर वाहनांच्या मोठ्या रांगा ठिकठिकाणी लागल्या होत्या़ कळंब शहरातील शिवाजी चौकात नायब तहसीलदार कुलकर्णी, पोनि सुनील नेवासे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी बाळकृष्ण भवर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, अशोक कुरूंद, सागर बाराते, शुभम राखुंडे, विकास गडकर, डॉ़ महाकुंडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते़

Web Title: Charka Jam on the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.