चार्ली फोडणार वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2016 12:09 AM2016-05-14T00:09:58+5:302016-05-14T00:15:11+5:30
औरंगाबाद : बीड बायपास, जालना रोड आणि लिंक रोडवर होणाऱ्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचे विशेष चार्ली पथक स्थापन करण्यात आले
औरंगाबाद : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीकडे पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याचे ठरविले असून बीड बायपास, जालना रोड आणि लिंक रोडवर होणाऱ्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचे विशेष चार्ली पथक स्थापन करण्यात आले आहे. या तीन मार्गांवर हे पथक सतत गस्त घालून पोलिसांच्या मदतीने वाहतुकीच्या समस्या सोडविणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत अनेक पर्याय शोधले; परंतु पाहिजे तसा फायदा अजून झालेला नाही. बाबा पेट्रोल पंप, क्रांतीचौक, हॉटेल अमरप्रीत चौक, आकाशवाणी, सेव्हन हिल, अग्रसेन चौक, सिडको चौक, एपीआय कॉर्नर, महानुभाव आश्रम चौक, नगर नाका, लिंक रोड चौक, देवळाई चौक, संग्रामनगर उड्डाणपूल चौक इ. ठिकाणी वाहनांच्या सतत रांगा लागलेल्या असतात.
शहरात लग्नाची वरात किंवा अन्य काही कारणांमुळे वाहतूक खोळंबल्यास अवघ्या काही मिनिटांमध्ये वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीची माहिती पोलिसांना मिळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यानंतर वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस कर्मचारी जाईपर्यंत अनेकदा काही तरी विपरीतच घडलेले पोलिसांना पाहावयास मिळते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत जाते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तीन विशेष फिरती चार्ली पथके स्थापन केली आहेत. त्यांना दिलेल्या मार्गावरून ते सातत्याने गस्त घालून कोंडी होऊ देणार नाहीत आणि कोंडी निर्माण झालीच तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.