भरपावसातला थरार; चिखलात पाठलाग करत पोलिसांनी तरुणाकडून गावठी कट्ट्यासह काडतुसे पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 05:12 PM2021-07-23T17:12:54+5:302021-07-23T17:17:28+5:30
Crime News In Aurangabad : हर्सूल परिसरातील पिसादेवीरोडवरील आईसाहेब चौकात दोनजण आपसात भांडण करीत होते. त्यातील एक जणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.
औरंगाबाद : गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे घेऊन आलेल्याची माहिती समजताच हर्सूल पोलिसांच्या पथकाने आरोपीला पकडण्यासाठी धाव घेतली. पोलिसांची गाडी आल्याचे दिसताच आरोपीने पावसात धूम ठोकण्यास सुरुवात केली. रस्त्यावर चिखल आणि वरून पडणाऱ्या पावसातही पोलिसांनी सदरील आरोपीला शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान हर्सूल परिसरातील पिसादेवीरोडवर घडली. ( Chase in Rain : the police seized cartridges from the youth along with a Gavathi katta in Aurangabad)
हर्सूल परिसरातील पिसादेवीरोडवरील आईसाहेब चौकात दोनजण आपसात भांडण करीत होते. त्यातील एक जणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिवाजी शिंदे, शिवाजी दांडगे, श्रवण गुंजाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आईसाहेब चौकात पोलिसांनी गाडी येत असल्याचा आवाज येताच जवळ पिस्तूल असलेला आरोपी हर्सूलच्या दिशेने पळून जाऊ लागला. पोलिसांच्या पथकानेही त्याच्या पाठीमागे हर्सूलच्या दिशेने धाव घेतली. हा पाठशिवणीचा खेळ अर्धा किलाेमीटरपर्यंत सुरू होता. अखेर उपनिरीक्षक खिल्लारे यांच्यासह दोन पाेलिसांनी शिताफीने पकडले.
तो झटापट करून पळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, पोलिसांनी पकडून ठेवले. त्याचवेळी त्याच्याजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीस नाव विचारले असता, त्याने रामचंद्र रमेश जायभाये (३२, रा. कुंभेफळ, ता. बुलढाणा) असे नाव सांगितले. बॅगमध्ये असलेली गावठी कट्टा व जिवंत काळडुसे व्यवस्थितपणे हाताळत पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीला हर्सूल पोलीस ठाण्यात आणले. ही कामगिरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, पोलीस कर्मचारी राठोड, दांडगे, शिंदे, तांदळे यांच्या पथकाने केली.
आरोपीस पोलीस कोठडी
हर्सूल पोलिसांनी आरोपी रामचंद्र जायभाये यास गुरुवारी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीने पोलिसांच्या चौकशीमध्ये कोणतीही माहिती दिलेली नाही. पकडलेला गावठी कट्टा, जिवंत काडतुसे कोणासाठी आणली होती. कोठून आणली होती. याविषयी पोलीस अधिक माहिती गोळा करीत आहेत. त्यातून गावठी कट्टे विकणारे रॅकेट उघडकीस होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.