पीडितेला २० लाख रुपयाला फसवले; महेबूब शेख प्रकरणात मदत केलेल्या मित्राचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 06:19 PM2021-11-13T18:19:17+5:302021-11-13T18:19:52+5:30
२० लाख रुपयांचे सहा महिन्यात दुप्पट ४० लाख रुपये होतील, असे आमिष दाखविले.
औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर मदत करणाऱ्या मित्राने पीडित युवतीला लग्नाचे आणि दुप्पट पैशाचे आमिष दाखवून २० लाख रुपयांना फसविले आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात नदीम शेख अलीमोद्दीन शेख (वय ३५, रा. टाइम्स कॉलनी, माशाल्ला बिल्डिंग) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
जिन्सी पोलिसात दाखल पीडितेच्या जबाबानुसार नजमा (वय ३०, नाव बदललेले आहे) ही पतीसोबत घटस्फोट झाल्यामुळे आई आणि भावासोबत राहते. तिने दिलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख विरोधात २६ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा दाखल करताना नजमाच्या चुलत्यांचा मित्र असलेला नदीम शेख अलीमोद्दीन शेख याच्यासोबत ओळख झाली. या प्रकरणात नदीमने नजमाला गुन्हा दाखल होईपर्यंत मदत केली. या गुन्ह्यात पोलीस तपास करताना घरी येतील, तेव्हा तुझ्याकडे पैसे सापडल्यास जेलमध्ये टाकतील, अशी भीती नदीमने दाखवली.
तसेच वडिलांच्या विम्याचे आलेले दहा लाख, चुलत बहिणीकडून घेतलेले ५ आणि नजमाजवळील ५ लाख असे एकूण २० लाख रुपयांचे सहा महिन्यात दुप्पट ४० लाख रुपये होतील, असे आमिष दाखविले. त्यामुळे नदीमकडे २० लाख रुपये ठेवण्यासाठी दिले. सहा महिन्यांनंतर नदीमला पैशाची मागणी केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. दरम्यानच्या काळात ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्याने लग्नाचेही आमिषही दाखवले. मेहबूब शेख प्रकरणी तपास सुरू असल्यामुळे नदीम तिला १ ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान अहमदनगर येथे घेऊन गेला. तेथे बसस्टँड परिसरातील दोन हॉटेलवर दोघे काही दिवस थांबले होते. २२ जूनला नदीमने कॅनॉट भागात पैशाची बोलणी करण्यासाठी बोलावले, तेथे तीन महिलांनी मारहाण केली. या महिला नदीम यानेच पाठविल्या असल्याचे नजमा हिने जबाबात म्हटले आहे. जुलैपासून वारंवार पैशाची मागणी केली असता जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक अनंता तांगडे करत आहेत.
मेहबूबला फसवले, मला फसवू शकत नाही
फिर्यादीने आरोपी नदीमला पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याने उलट ब्लॅकमेलर म्हणून हिणवत मेहबूबला फसवले तसे मला फसवू शकत नाही. तुझ्याशी लग्नही करणार नाही, असे सांगून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.