टेलिकॉम फायबरचे १० कोटींचे कंत्राट मिळवून देतो, आमिष देऊन अभियंत्यास २० लाखांना फसवले
By राम शिनगारे | Published: September 8, 2022 06:27 PM2022-09-08T18:27:22+5:302022-09-08T18:27:45+5:30
काम मिळवून देण्याचा मोबदला म्हणून दहा कोटी रुपयांच्या दहा टक्के रॉयल्टी देण्याचे ठरले.
औरंगाबाद : टेलिकॉम फायबरचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी अभियंत्याला २० लाख रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात जळगाव येथील दोन भावांसह तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
अमोल ऊर्फ सागर दत्तात्रय चव्हाण, राहुल दत्तात्रय चव्हाण, तुषार पुंडलिक पाटील (तिघे रा. जामनेर, जि.जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. अभियंता प्रशांत ढाकणे (रा. विठ्ठलनगर, मुकुंदवाडी) यांच्या फिर्यादीनुसार; त्याचे पुण्यातील सिंहगड रस्ता येथे फाल्कन इंडस्ट्री कंपनीचे कार्यालय आहे. प्रशांत यांच्या ओळखीचे राहुल व अमोल हे श्री एंटरप्राइजेस चालवितात. तिसरा आरोपी तुषार याची स्वतःची लॉर्ड एस. पी. प्रा. लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीने श्री एंटरप्राइजेसला कामाचे कंत्राट दिले होते. आरोपी राहुल याने फिर्यादीला औरंगाबाद जिल्ह्यासाठी टेलिकॉम आणि फायबर प्रकल्पाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यावरून फिर्यादीने २४ ऑगस्ट २०२० मध्ये औरंगाबादेत एका वकिलांकडून दोघा आरोपींच्या उपस्थितीत श्री एंटरप्रायजेससोबत टेलिकॉम आणि फायबर प्रकल्पाच्या दहा कोटी रुपयांच्या कामांचा करार केला.
काम मिळवून देण्याचा मोबदला म्हणून दहा कोटी रुपयांच्या दहा टक्के रॉयल्टी चव्हाण बंधूंना देण्याचे ठरले. दहा टक्क्यांपैकी दोन टक्के रक्कम ही वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी प्रशांत यांनी दि. ३ सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या बँक खात्यातून २० लाख रुपये पाठविले. यानंतर दोघा भावांनी दि. ५ सप्टेंबर २०२० रोजी बनावट कार्यारंभ आदेशही दिला; तसेच दहा दिवसांत काम सुरू होण्याचे आश्वासन दिले, मात्र काम काही सुरूच झाले नाही. यानंतर पैसे परत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. त्यानंतर विश्वास बसावा यासाठी श्री एंटरप्राइजेसने कंत्राट घेतलेल्या लॉर्ड एस. पो. प्रा. लिमिटेडचा मालक तुषार पाटील हा दि. ३ जानेवारी २०२१ रोजी औरंगाबादेत आला आणि तुमचे पैसे परत करतो, असे सांगितले, मात्र पैसे काही मिळालेच नाहीत.
बँकेचा कोरा धनादेश दिला
आरोपी तुषार पाटील याने हमी म्हणून बँकेचा कोरा चेकही ढाकणे यांना दिला होता. यानंतरही काम सुरू झाले नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे फिर्यादीने मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप वाघ करीत आहेत