बनावट कूपनद्वारे नागरिकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 07:25 PM2018-11-16T19:25:15+5:302018-11-16T19:25:51+5:30

बक्षीस लागल्याची थाप मारून हे बक्षीस मिळविण्यासाठी दहा हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली.  

cheating by fake coupons; gang was arrested | बनावट कूपनद्वारे नागरिकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

बनावट कूपनद्वारे नागरिकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद : कंपनीच्या योजनेनुसार कूपन क्रॅश करून मोटारसायकल आणि गॅस शेगडी बक्षीस लागल्याची थाप मारून हे बक्षीस मिळविण्यासाठी दहा हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली.  

सुभाष महिंद्र्र लोखंडे (३२) आणि राजेंद्र बाळासाहेब शिंदे (३६,रा. धामणगाव देवी, ता.  पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील ढाके फळ येथील आशाबाई कोल्हे या ८ नोव्हेंबर रोजी घरी असताना दोन्ही आरोपी त्यांच्या घरी आले. आरोपींनी त्यांच्या त्रिमूर्ती सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग बिझनेस प्रा. लि. या कंपनीच्या नावाने दोन कूपन देऊन ते लगेच क्रॅश करून घेतले. एका कूपनवर गॅस शेगडी, तर दुसऱ्या कूपनवर मोटारसायकल बक्षीस लागल्याचे त्यांनी त्यांना सांगितले. नेमका तेव्हा आशाबाई यांचा मुलगा सचिन कोल्हे हा घरी आला.

आरोपींनी त्यांना गाडीच्या पासिंगकरिता दहा हजार रुपये आम्हाला दिले, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाडी मिळेल, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून सचिन यांनी आरोपींना दहा हजार रुपये दिले. आरोपींनी त्यांचा मोबाईल नंबर दिला आणि ते तेथून निघून गेले. दोन दिवसांनंतरही आरोपींनी गाडी आणून न दिल्याने सचिन यांनी आरोपींच्या मोबाईलवर संपर्क  साधला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पैठण ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सचिन कापुरे, भगतसिंग दुल्हत, कर्मचारी विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, संजय काळे, सागर पाटील, राहुल पगारे, योगेश तरमळे, गणेश गांगवे आणि रमेश सोनुने यांनी तपास करून १४ नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत लुबाडलेल्या रकमेतील साडेचार हजार रुपये, मोबाईल, कार आणि त्रिमूर्ती कंपनीच्या नावाचे बनावट कूपन असा माल काढून दिला. या आरोपींकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पो.नि.भुजंग यांनी व्यक्त केली.

Web Title: cheating by fake coupons; gang was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.