बँके चे कर्ज काढण्याच्या आमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:06 AM2018-02-20T01:06:35+5:302018-02-20T01:06:40+5:30
व्यवसायासाठी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून फसविणा-यास गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : व्यवसायासाठी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून फसविणा-यास गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवारी अटक केली.
कैलास जयवंतराव शिंदे (३८, रा. तळपिंप्री, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी सामान्यांना कर्जाचे आमिष दाखवून लोन प्रोसेसिंग फीस आणि विविध कारणे सांगून पैसे उकळतो आणि गायब होतो, अशी माहिती खब-याने दिली. सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी, शेख हकीम आणि सय्यद अश्रफ यांनी त्याला बालाजीनगर परिसरात ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर पोलिसांनी तक्रारदारास त्याच्यासमोर उभा केले तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तक्रारदार राजू रामचंद्र परदेशी (रा. गुलमोहर कॉलनी) यांना चार महिन्यांपूर्वी तो भेटला. त्याने कर्ज काढून देतो, असे सांगितले. त्यासाठी प्रोसेसिंग फीस लागते, ती दिली तर तुम्हाला मोठे दुकान टाकता येईल, असे कर्ज काढून देण्याची ग्वाही त्याने दिली. यानंतर त्याने त्यांचे शॉप अॅक्ट लायसन्स काढून दिले. एसबीआय बँकेत खाते उघडून देऊन आधार कार्ड, पॅनकार्डची झेरॉक्स आणि कर्जाच्या प्रोसेसिंग फीसकरिता ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर तो पंधरा दिवस गायब झाला. काही दिवसांनी राजू यांनी आरोपीशी संपर्क साधला असता तुमची फाईल बँकेत टाकल्याचे सांगितले. यामुळे राजू यांचा आरोपीवर विश्वास बसला. त्यांनी त्यांच्या मामाचा मुलगा प्रेम लक्ष्मण परदेशी यांनाही कर्जाची गरज असल्याचे सांगितले. आरोपीने त्यांना पाच लाख रुपये कर्ज काढून देण्यासाठी फीस म्हणून १५ हजार रुपये उकळले. तर त्यांचा मित्र नितीन परमार यांनाही पाच लाख रुपये कर्जासाठी पैसे घेतले.नितीन यांचीही फाईल बँकेत टाकल्याचे सांगून आणखी १५ हजार रुपये घेतले. कर्ज मंजूर न झाल्याने राजू यांनी आरोपीकडे कर्जाविषयी विचारणा केली असता कर्ज मंजूर होण्यास वेळ लागेल. आज होईल, उद्या होईल असे तो सांगू लागला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या नावाची कर्ज फाईल बँकेत नसल्याचे समजले.