'प्राध्यापकांनो, आठ दिवसांत पाचशे उत्तरपत्रिका तपासा'; परीक्षा संचालकांचे आदेश
By राम शिनगारे | Published: January 3, 2024 02:24 PM2024-01-03T14:24:08+5:302024-01-03T14:25:02+5:30
३० दिवसांत निकाल जाहीर करण्यासाठी उचलले पाऊल
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी चार जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर दाखल झाल्या आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आठ दिवसांत किमान ५०० उत्तरपत्रिका तपासण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिले आहेत. त्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आवाहनही संचालकांनी केले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार ३० दिवसांत निकाल जाहीर करावेत अशी तरतूद आहे. या तरतुदीचे पालन करणे विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालय, अध्यापकांना बंधनकारक आहे. कुलपती व राज्य शासनाकडून वारंवार विद्यापीठांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व्यक्तिश: लक्ष घालून मूल्यांकनाच्या कामासाठी प्राध्यापकांनी ८ दिवस सहभाग नोंदवित स्वत:च्या विषयाच्या किमान ५०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. त्यासाठी प्राचार्यांनी प्राध्यापकांना मेसेज, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून कार्यमुक्त न करता महाविद्यालयाच्या लेटरहेडवर संबंधित प्राध्यापकांना कार्यमुक्त करावे आणि त्या आदेशाची एक प्रत मूल्यांकन केंद्रात जमा करावी, असेही परीक्षा संचालक डॉ. गवळी यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील जिल्ह्यातच मूल्यांकन
जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका इतर जिल्ह्यातील मूल्यांकन केंद्रांवर तपासण्यासाठी पाठविण्यात येत होत्या. मात्र, आता जालना जिल्ह्यातील उत्तरपत्रिका जालना जिल्ह्यात असलेल्या मूल्यांकन केंद्रांवर पाठविण्यात आल्याची माहिती आहे. एका प्राध्यापकाकडे तर त्याच्या महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा ही बाब उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले.
चार जिल्ह्यात १५ मूल्यांकन केंद्र
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५, बीड ५, धाराशिव २ आणि जालना जिल्ह्यातील ३ मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिका तपासण्यात येत आहेत.
विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना कामाला लावा
अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी कधीही मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी संबंधित प्राध्यापकांना प्राचार्यांनी अधिकृतपणे कार्यमुक्त केले पाहिजे. त्याचवेळी परीक्षा विभागाने विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही हाच नियम लागू करावा आणि त्यांच्याकडून मूल्यांकन करून घेतले पाहिजे.
- डॉ. रविकिरण सावंत, सदस्य, व्यवस्थापन परिषद, प्राध्यापक गट