औरंगाबादकरांनी ७ महिन्यांत रिचवले पावणे दोन कोटी लिटर मद्य; २, ७८४ कोटींचा महसूल जमा

By राम शिनगारे | Published: November 14, 2022 06:18 PM2022-11-14T18:18:00+5:302022-11-14T18:19:54+5:30

मागील काही महिन्यांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाईचा सपाटा, महसुलात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ

Cheers! 1.75 crore liters of liquor drunk by Aurangabadkars in 7 months, recovery of 2,784 crores | औरंगाबादकरांनी ७ महिन्यांत रिचवले पावणे दोन कोटी लिटर मद्य; २, ७८४ कोटींचा महसूल जमा

औरंगाबादकरांनी ७ महिन्यांत रिचवले पावणे दोन कोटी लिटर मद्य; २, ७८४ कोटींचा महसूल जमा

googlenewsNext

- राम शिनगारे
औरंगाबाद :
शहरासह जिल्ह्यातील मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १ एप्रिल ते ३१ आक्टोबर २०२२ यादरम्यान देशी, विदेशी, बीअर आणि वाइन या मद्यांच्या प्रकारात तब्बल १ कोटी ७५ लाख ९९ हजार १०० लिटर एवढ्या दारूची विक्री झाल्याचे आकडेवारीतून समोर आले. या मद्यविक्रीतून शासनाला तब्बल २ हजार ७८४ कोटी ८९ लाख रुपयांचा महसूल मिळाला असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत तो ५० टक्क्यांनी अधिक आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग शासनाचा महसूल वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाईचा सपाटाचा लावला आहे. याच कालावधीत महसुलांमध्येही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादउत्पादन शुल्क विभागाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४,२०० कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते. त्या वर्षात एकूण ३ हजार ९३७ कोटी ९८ लाख रुपये एवढा महसूल जमा झाला. २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार २५७ कोटी ३० लाख रुपये एवढे टार्गेट दिले आहे. मागच्या वर्षी १ एप्रिल ते ३१ आक्टोबर २०२१ यादरम्यान १,८५५ कोटी ११ लाख रुपये महसूल जमा झाला होता. यावर्षी याच कालावधीत २,७८४ कोटी ८९ लाख रुपयांचा महसूल मिळवत ५० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

परवानाधारकांची संख्या वाढली
राज्य शासनाने उत्पादन शुल्क विभागाला ठरवून दिलेले टार्गेट पूर्ण करण्यात नक्कीच यश मिळेल. महसुलात वाढीसाठी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहे. अवैध ढाब्यांवर केलेल्या कारवाईमुळे परवानाधारकांची संख्या वाढत आहे.
- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद

अशी झाली मद्यविक्री (१ एप्रिल ते ३१ आक्टोबरपर्यंत)
प्रकार................२०२२-२३..........२०२१-२२..........वाढ
देशी दारू...........९३,८७,७०५........७८,४५,२४५.....१९.०७ टक्के
विदेशी दारू.........४०,९५,०१८........३०,३८,९६३.....३४.०८ टक्के
बीअर.................४०,२०,३२२........२२,१३, २४३....८१.०६ टक्के
वाइन................९६,०५५...............५९,१२२..........६२.०५ टक्के
(मद्यविक्री लिटरमध्ये)

Web Title: Cheers! 1.75 crore liters of liquor drunk by Aurangabadkars in 7 months, recovery of 2,784 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.