चिअर्स! वर्षभरात मराठवाड्यातील मद्यपींनी रिचवली ५ हजार ७३३ कोटींची दारू
By राम शिनगारे | Published: April 3, 2023 02:07 PM2023-04-03T14:07:59+5:302023-04-03T14:08:29+5:30
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या चार जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध मद्य विक्री, बनावट दारूच्या विक्रीवर कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर : राज्य उत्नादन शुल्क विभागाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागाला महसुलाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले करीत बाजी मारली. या विभागाला २०२२- २३ आर्थिक वर्षात ५ हजार २५० कोटी रुपये महसुलाचे टार्गेट होते. हे टार्गेट पूर्ण करीत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यातून ५ हजार २५६ कोटी ६६ लाख रुपयांचा महसूल ३१ मार्चअखेर प्राप्त झाल्याची माहिती विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. नांदेड विभागाच्या चार जिल्ह्यांना ६१३ कोटी २८ लाख रुपये महसूलचे टार्गेट होते. त्या विभागाने ४७७ कोटी ५ लाख रुपये एवढाच महसूल प्राप्त केला आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी एकच उपायुक्त हाेते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्याचे विभाजन होऊन छत्रपती संभाजीनगर विभागात चार आणि नांदेड विभागात चार जिल्हे अशी विभागणी करण्यात आली. त्यातील पहिल्या विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांचा, तर दुसऱ्यात नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे असते. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील आकडेवारी १ एप्रिल रोजी समोर आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाने टार्गेट पूर्ण केले. नांदेड विभागाचे टार्गेट आणि प्राप्त महसूलात मोठी तफावत आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ हजार १०० कोटी रुपयांची दारूची विक्री झाली. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यात ४५० कोटी, धाराशिवमध्ये १३७, लातूर जिल्ह्यात १७ कोटी ५० लाख, बीड जिल्ह्यात ११ कोटी ३१ लाख रुपयांची दारू विकली आहे.
टार्गेट पूर्ण करण्यात यश
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या चार जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध मद्य विक्री, बनावट दारूच्या विक्रीवर कारवाई केली. तसेच अवैध ढाब्यावाल्यांच्या विरोधात उघडलेल्या माहिमेमुळे राज्य शासनाने ठरवून दिलेले महसूलचे टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळाले. चालु आर्थिक वर्षातही हा विभाग महसूलात आघाडीवर राहणार आहे.
- प्रदीप पवार, उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, छत्रपती संभाजीनगर
राज्यात २१ हजार ५०० कोटींचा महसूल
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ५ हजार ७३३ कोटींची दारूच्या विक्रीतून महसूल राज्य शासनाला मिळाला आहे. त्याचवेळी राज्यात दारूची विक्री, परवान्याचे नूतनीकरण आदीतून २१ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झाला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्या तुलनेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल २५ टक्के वाढ नोंदविल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४ हजार कोटी रूपये जास्त मिळाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभाग (आकडे कोटीमध्ये)
जिल्हा.....महसूलचे टार्गेट.....प्राप्त महसूल
छत्रपती संभाजीनगर...५०९५....५१००
धाराशिव.......१३५.......१३७.०५
बीड........१०.......११.३१
जालना.......१०.....८.३०
नांदेड विभाग (आकडे कोटीमध्ये)
जिल्हा.....महसूलचे टार्गेट.....प्राप्त महसूल
नांदेड....५८५........४४९.९०
परभणी.....६.५७.....६.४०
लातूर.....१८.६२......१७.५०
हिंगोली....३.०९.......३.२५