केमेस्ट्रीच्या उत्तरपत्रिका थातूरमातूर तपासून केले गुणदान; बोर्डात गंभीर प्रकार उघडकीस
By राम शिनगारे | Published: May 2, 2024 08:08 PM2024-05-02T20:08:31+5:302024-05-02T20:11:31+5:30
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा प्रताप
छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या रसायनशास्त्र (केमेस्ट्री) विषयाच्या ४ हजार २०० उत्तरपत्रिका मॉडरेटरकडून तपासणी झालेल्या नसल्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तत्काळ परत मागविल्या. या उत्तरपत्रिका युद्धपातळीवर शहरातील केमेस्ट्रीच्या मॉडरेटर शिक्षकांकडून तपासून घेण्यात आल्या. त्यात शेकडो उत्तरपत्रिका थातूरमातूर तपासूनच गुणदान केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरपत्रिका मंडळात मॉडरेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान टळल्याची माहिती तपासणी करणाऱ्या शिक्षकांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान ४४९ केंद्रांवर घेण्यात आल्या आहेत. या परीक्षांना १ लाख ७९ हजार १४ विद्यार्थी बसले होते. पहिला पेपर झाल्यानंतर त्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिका तपासण्यासाठी संबंधित विषयांच्या प्राध्यापक, शिक्षकांकडे पाठविण्यात येत होत्या. सहा शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांची एका मॉडरेटरकडून तपासणी केली जाते. एका मॉडरेटरच्या अंतर्गत सहा शिक्षक असतात. मॉडरेटरांना १८ एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिका मंडळाकडे जमा करण्याचे आदेश होते. त्यानुसार १९ एप्रिल रोजी मंडळाच्या सचिवांनी उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला. तेव्हा रसायनशास्त्र विषयाच्या जवळपास ४ हजार २०० उत्तरपत्रिका मंडळात पोहोचलेल्याच नव्हत्या. त्यामुळे मंडळाने तपासणी झालेल्या व न झालेल्या सर्व संबंधित उत्तरपत्रिका जमा करून मंडळात आणल्या.
मंडळात २० ते २५ एप्रिलदरम्यान विशेष ड्राईव्ह घेत ज्या उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या होत्या, त्या मॉडरेटरकडून तपासून घेतल्या, तर ज्या उत्तरपत्रिकांची प्राथमिक पातळीवरच तपासणी बाकी होती. त्यांचे मूल्यांकनही शिक्षकांकडून घेण्यात आले. मॉडरेट करण्यात आलेल्या शेकडो उत्तरपत्रिका थातूरमातूर तपासून गुण देण्यात आले होते. काही प्रश्नांची उत्तरे चुकीची असतानाही गुण देण्यात आल्याचे प्रकार मॉडरेटरच्या निदर्शनास आल्यामुळे अनेकांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. एका प्राध्यापकांकडून अंदाजे १०० पेक्षा अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी मंडळाने करून घेतली आहे. ज्या ठिकाणाहून या उत्तरपत्रिका मंडळात आणण्यात आल्या. त्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालये ही विनाअनुदानित असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
बारावीचे काम पूर्ण, दहावी ९० टक्के
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. बारावीच्या उत्तरपत्रिकांची संख्या ही १० लाख ३१ हजार २६३ एवढी होती. या संपूर्ण उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. दहावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची संख्या ही १६ लाख ५७ हजार ३३७ एवढी आहे. त्यापैकी ९० टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली असल्याचे विभागीय सचिव वैशाली जामदार यांनी सांगितले.
नोटीस बजावण्यात येणार
मंडळाने उत्तरपत्रिकांची तपासणी करून जमा करण्यासाठी १८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. त्या मुदतीत न जमा झालेल्या उत्तरपत्रिका मंडळात मागविण्यात आल्या. त्यातील काही उत्तरपत्रिका मॉडरेटरकडून तपासणी होणे बाकी होते. त्यात रसायनशास्त्र विषयाच्या ४ हजार २०० उत्तरपत्रिकांचा समावेश होता. शहरातील शिक्षकांनी सहकार्य केल्यामुळे संबंधित उत्तरपत्रिका मॉडरेटरकडून तपासून घेतल्या आहेत. ज्यांनी कामात दिरंगाई केली, त्या संबंधितांना नोटिसा देण्यात येणार आहेत.
- वैशाली जामदार, सचिव, विभागीय मंडळ.