करार मोडला, धनादेशही वटले नाहीत; निवृत्त न्यायाधीशाची बिल्डरकडून ८५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:30 IST2025-03-07T17:25:24+5:302025-03-07T17:30:02+5:30
प्लॉट डेव्हलप करण्याचे आमिष, करार मोडला, ६ धनादेशही अनादरीत

करार मोडला, धनादेशही वटले नाहीत; निवृत्त न्यायाधीशाची बिल्डरकडून ८५ लाखांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : प्लॉट डेव्हलप करण्याचे आमिष दाखवून निवृत्त न्यायाधीश त्र्यंबक जाधव (रा. तळेश्वर हाउसिंग सोसायटी, मकबरा रोड) यांची बिल्डरने ८५ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी मधुसूदन दिलीप उत्तरवार (रा. मनजित प्राईड, बीड बायपास) याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ते वास्तव्यास असलेल्या तळेश्वर काॅलनीतील प्लॉट त्यांना डेव्हलप करायचा होता. त्यानुसार ११ फ्लॅट व २ कार्यालयाची इमारत बांधून त्यात ५५ टक्के जाधव तर उत्तरवारची ४५ टक्के भागीदारी ठरली. त्याला जाधव यांनी त्याला प्लॉट गहाण ठेवून कर्ज न घेण्याची अट घातली होती. विकसन करारनामा व कधीही रद्द न होणारे मुखत्यारनाम्याची निबंधक कार्यालयात नोंदणी केली. जवळपास ३५ टक्के बांधकामानंतर प्लॉटवर यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह लि. बँकेने कर्जाची पाटी लावली. उत्तरवारने सदर प्लॉट गहाण ठेवून ६० लाखांचे प्राेजेक्ट कर्ज घेतले. त्याचा जाधव यांच्या पीआर कार्डवर बोजा टाकल्याचे बँकेतर्फे जाधव यांना कळाले.
धनादेश दिले, तेही वटले नाहीत
त्यानंतर उत्तरवारने काम होत नसल्याचे सांगून हात वर केले. त्याच्या विनंतीवरून ६० लाखांच्या कर्जासाठी कॅन्सलेशन ऑफ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट व जीपीए रजिस्टर्ड कॅन्सलेशन केले. उत्तरवारने त्यांना १० लाखांचे सहा धनादेश दिले.
सासऱ्यांच्या नावे दुसरी फसवणूक
उत्तरवारने त्याचे ६० लाखांचे कर्ज फेडण्यासाठी जाधव यांनाच कर्ज घेऊन रक्कम देण्याची विनंती केली. मेव्हण्याच्या मदतीने उत्तरवारने जाधव यांना यवतमाळ को-ऑपरेटिव्ह लि. बँकेकडून दीड कोटींचे कर्ज मंजूर करून दिले. त्याचे ८५ लाख रुपये जमा होताच १७ मार्च रोजी जाधव यांच्या तुळजाई ट्रेडिंग कंपनीच्या खात्यातून स्वत:च्या प्लॅटिनियम बिल्डर्सच्या खात्यात ती रक्कम जमा केली. त्यावर ८५ लाखांचे १६ धनादेश जाधव यांना दिले. त्याव्यतिरिक्त ४ लाखांचे ५ धनादेश दिलेच नाही. मात्र, त्यातील बरेच धनादेश वटलेच नाहीत. उपनिरीक्षक शंकर डुकरे तपास करत आहेत.