छाजेड कुटुंब हल्ला प्रकरण : हल्ला करणारा नव्हे; पण गच्चीवर रॉड सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:47 PM2019-02-07T13:47:38+5:302019-02-07T13:57:22+5:30
आरोपीने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
औरंगाबाद : उच्चभ्रू वसाहत रघुवीरनगरातील उद्योजक पारस छाजेड यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही; परंतु आरोपीने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रॉड कधी सापडला याविषयी गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलिसांनीही माहिती देण्यास नकार दिला.
पारस छाजेड यांची भेट घेण्यासाठी पोलीस पथकाने प्रयत्न केले; परंतु त्यांना भेटण्यास व विचारपूस करण्यास डॉक्टरांनी परवानगी नाकारलेली आहे, शशिकला व पार्थला रुग्णालयातून सुटी झाली आहे, अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. हल्ला झाला त्याच्या दोन दिवसांनंतर गुन्हे शाखेने बंगल्याच्या सर्व बाजूंची तपासणी केली त्यावेळी रॉड मिळाल्याचे म्हटले जाते. शिवाय हा रॉड छाजेड यांच्या इमारतीच्या छतावर सापडल्याची चर्चाही आहे. रॉड ‘थेअरी’ सांगून पोलिसांचा तपास नेमका भरकटतो आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. आरोपीने हल्ला का आणि कशासाठी केला याचे कोडे अद्याप पोलिसांना उलगडलेले नाही.
लोखंडी रॉड जप्त
पहिल्या दिवसापासून विविध पथकांनी छतावर व इतरत्र पाहणी केली असून, आठ दिवसांनंतर गुन्हे शाखेच्या पथकाला बंगल्याच्या छतावर रक्ताने माखलेल्या अवस्थेतील लोखंडी रॉड सापडला आहे. तो रॉड फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आला असून, हल्ल्यात तोच रॉड होता का हे तपासणी अहवालानंतरच सांगता येईल, असा दुजोरा पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिला.