छत्रपती संभाजीनगरात शासकीय महिला कृषी महाविद्यालयाची वर्षभरापूर्वी घोषणा; पुढे काहीच नाही
By बापू सोळुंके | Published: December 22, 2023 05:33 PM2023-12-22T17:33:52+5:302023-12-22T17:34:00+5:30
महाविद्यालय स्थापन करण्याच्या घोषणेला वर्ष उलटले तरी संभाजीनगरातील महिला कृषी तंत्र महाविद्यालय उभारण्यासाठी एक रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला नाही.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील कृषी विज्ञान केंद्र परिसरात अथवा हिमायतबाग येथील फळ संशोधन केंद्र परिसरात शासकीय महिला कृषी तंत्र महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन कृषिमंत्र्यांनी विधानसभेत केली होती. या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात वर्षभरात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवर कृषी विज्ञान केंद्र अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. शासकीय महिला कृषी तंत्र महाविद्यालय झाल्यास मराठवाड्यातील मुलींना कृषी तंत्रज्ञान पदवी घेणे शक्य व्हावे, यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कृषी तंत्र महाविद्यालय सुरू करावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. आ. सतीश चव्हाण यांनी गतवर्षी शासनाचे याकडे लक्ष वेधले होते. तेव्हा तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर शासकीय महिला कृषी तंत्र विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा विधानसभेत केली होती.
कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली १२० एकर जमीन कृषी विज्ञान केंद्र येथे उपलब्ध आहे. यामुळे येथे हे महाविद्यालय स्थापन करणे शक्य होणार आहे. वर्षभरात तातडीने महाविद्यालय स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महाविद्यालय स्थापन करण्याच्या घोषणेला वर्ष उलटले तरी संभाजीनगरातील महिला कृषी तंत्र महाविद्यालय उभारण्यासाठी एक रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला नाही. अथवा आवश्यक ते शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीचा निर्णय शासनाने घेतला नाही. परिणामी, वर्षभरानंतर महिला कृषी तंत्र महाविद्यालयाची नुसतीच घोषणा झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
कृषी विद्यापीठ उपकेंद्राची मागणीही हवेत
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र, या मागणीची दखल घेतली गेली नाही.