बापरे! एक, दोन नव्हे, पोटातून निघाले १३० खडे; जगातील पहिलीच घटना असल्याचा डॉक्टरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 09:28 AM2024-07-07T09:28:18+5:302024-07-07T09:28:32+5:30
१३० मूतखडे निघण्याची ही जगातील पहिलीच घटना असल्याचा डाॅक्टरांचा दावा
छत्रपती संभाजीनगर : मूतखडा म्हटला की, एखाद-दोन असतील, असे सर्वसामान्यांना वाटते. मात्र, एका ७८ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल १३० मूतखडे बाहेर काढण्यात आले. घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील डाॅक्टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या ‘केसेस’मध्ये १३० मूतखडे निघण्याची ही जगातील पहिलीच घटना असल्याचा दावा डाॅक्टरांनी केला.
घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात ४ जूनला शहरातील ७८ वर्षीय ज्येष्ठ महिला दाखल झाली. तपासणीअंती त्यांच्या लघवीच्या पिशवीत मूतखडे तयार झाल्याचेही निदान झाले. डाॅक्टरांनी सव्वादोन तास शस्त्रक्रिया केली.गर्भपिशवी काढून टाकण्यात आली. याच वेळी लघवीच्या पिशवीतून
मूतखडे काढण्यात आले. महिनाभरानंतर ४ जुलै रोजी या महिलेला घाटीतून सुट्टी देण्यात आली.
७८ वर्षीय महिलेच्या लघवीच्या पिशवीत तयार झालेले १३० मूतखडे काढण्यात आले. जगात यापूर्वी अशा १४ ‘केसेस’ झालेल्या आहेत. त्यात सर्वाधिक ३० मूतखडे काढण्यात आले - डाॅ.श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी.