छत्रपती संभाजीनगरातही ८० टँकर, ३५० फेऱ्या दररोज; डिसेंबरनंतर टँकरची संख्याही वाढणार
By मुजीब देवणीकर | Published: November 24, 2023 07:59 PM2023-11-24T19:59:21+5:302023-11-24T19:59:36+5:30
यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऐन हिवाळ्यात टँकर सुरू करावे लागले. शहरातही सध्या ८० टँकर दररोज ३५० फेऱ्या करीत आहेत. डिसेंबरनंतर शहरातही टँकरची संख्या वाढणार आहे. नागरिकांची मागणी आल्यास टँकरने पाणी देण्यात येणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. पाणीपुरवठा करणारे हे टॅंकर फक्त मनपाचे आहेत. मात्र, शहरातील खासगी टॅंक़रची संख्या यापेक्षाही अधिक आहे.
१ फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवसाआड पाणी देण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरात अतिरिक्त ८० एमएलडी पाणी वाढले तरी नो-नेटवर्क भागाला टँकरद्वारे पाणी दिले जाणार आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. ज्या भागात जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. परंतु, पाणी पुरवठा केला जात नाही, तेथे टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार असून टँकरची संख्या वाढली तरी चालेल. मात्र, पाण्यापासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही, असेही प्रशासक यांनी नमूद केले.
४५ वसाहतींना ८० टँकरद्वारे पाणी
शहरातील नो-नेटवर्क भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांकडून ठरावीक रक्कम घेण्यात येते. ८० टँकरद्वारे दररोज ३५० फेऱ्या होत आहेत. सिडको एन-५ च्या जलकुंभावरून ३१ टँकर, एन-७ च्या जलकुंभावरून २० टँकर, कोटला कॉलनी जलकुंभावरून १८ टँकर तर नक्षत्रवाडी येथून ८ या प्रमाणे टँकर सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली.