डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी 'रामबाण', छत्रपती संभाजीनगरात मनपा जळालेले ऑइल वापरणार
By मुजीब देवणीकर | Published: June 29, 2024 12:10 PM2024-06-29T12:10:12+5:302024-06-29T12:10:56+5:30
१०० लिटरपेक्षा अधिक ऑइल देणाऱ्यांचा छत्रपती संभाजीनगर महापालिका करणार गौरव
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी पावसाळ्यात शहरातील काही भागात डेंग्यू, मलेरियाचे थैमान असते. शहरात २६३ अतिजोखमीचे स्पॉट आहेत, या भागात कोणतेही साथ रोग पसरू नयेत म्हणून मनपाने जळालेल्या इंजिन ऑइलचा वापर करण्याचे निश्चित केले. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी, डबके साचलेले राहील तेथे जळालेले इंजिन ऑइल टाकले जाईल. त्यामुळे डास या ठिकाणी थांबणार नाहीत, डासांचे अड्डेही नष्ट होतील. लवकरच संपूर्ण शहरात ऑइल टाकण्याची मोहीम सुरू होणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने मागील दोन ते तीन वर्षांपासून सूक्ष्म नियोजन केले. त्यामुळे डेंग्यू, मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या अत्यंत कमी होती. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी मलेरिया विभागाचे सर्व कर्मचारी एकत्र करीत प्रत्येक झोनमध्ये एकच वेळी व्यापक मोहीम राबविली. त्यांची ही युक्ती यशस्वीसुद्धा ठरली.
सध्या राज्यभरात डेंग्यूने डोके वर काढायला सुरुवात केली. शासन निर्देशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. डॉ. मंडलेचा यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते. या डासांपासून डेंग्यू, मलेरियासह इतर कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. पावसाचे पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये जळालेले इंजिन ऑइल टाकल्यास ते पाण्यावरती तरंगते. त्यामुळे डबक्यांतील पाण्यात तयार होणाऱ्या डासांच्या अळ्यांना ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनअभावी त्या डासअळ्या मरतात आणि डासांचे उत्पत्ती चक्र थांबते. १०० लिटरपेक्षा अधिक जळालेले इंजिन ऑइल देणाऱ्यांचा पालिकेकडून गौरव केला जाईल, असेही डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले.
कर्मचारी येणार घरोघरी
जळालेले इंजिन ऑइल नागरिकांकडे असेल तर ते त्यांनी घरोघरी येणाऱ्या महापालिकेच्या मलेरिया पर्यवेक्षकांकडे विनामूल्य देऊन या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. मंडलेचा यांनी केले आहे. गॅरेजवाल्यांकडे जळालेले इंजिन ऑइल असल्यास ते विनामूल्य देण्यासाठी पालिकेचे मलेरिया औषधी भांडारपाल गोरख तुपे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.