छत्रपती संभाजीनगराला मिळणार १०० इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी

By मुजीब देवणीकर | Published: July 4, 2024 04:45 PM2024-07-04T16:45:32+5:302024-07-04T16:46:33+5:30

पीएम ई-बससेवा योजनेसाठी महापालिकेकडून लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar will get 100 electric buses, approved by the central government | छत्रपती संभाजीनगराला मिळणार १०० इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी

छत्रपती संभाजीनगराला मिळणार १०० इलेक्ट्रिक बस, केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी

छत्रपती संभाजीनगर : पीएम ई-बस योजनेंतर्गत केंद्र शासनाने यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश केला. शहरासाठी १०० ई-बस डिसेंबर अखेरपर्यंत प्राप्त होणार आहेत. जानेवारी २०२५ मध्ये नवीन ई-बस शहरात धावतील. यासाठी लागणारा अत्याधुनिक डेपो स्मार्ट सिटी प्रशासनाने जाधववाडी येथे ११ एकर जागेवर उभारला. त्यामुळे बस लवकर प्राप्त होणार आहेत.

केंद्र शासनाने ऑगस्ट २०२३ मध्ये पीएम ई-बस सेवा योजनेची घोषणा केली. त्यासाठी दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने स्मार्ट सिटी मार्फत प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत व्हावी, प्रदूषण रोखण्यासाठी या बसेस उपयुक्त ठरत आहेत. केंद्राने शहरासाठी शंभर इलेक्ट्रिक बस देण्यास हिरवी झेंडी दाखविली. बससाठी लागणारा मोठा डेपो अगोदरच स्मार्ट सिटीने तयार करून ठेवला आहे. आणखी डेपो वाळूज एमआयडीसीने आरक्षित केलेल्या जागेवर स्मार्ट सिटीमार्फत बांधण्याचे नियोजन आहे. एमआयडीसीसोबत लवकरच जागेसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. बसडेपो उभारण्यासाठी दीडशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक केंद्र सरकारकडे सादर केले आहे.

सर्व प्रक्रिया लवकरात लवकर
पीएम ई-बससेवा योजनेसाठी महापालिकेकडून लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे. केंद्र सरकारने देखील बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. शंभर ई-बसेस नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डिझेलवर १०० बस सुरू
स्मार्ट सिटीमार्फत सध्या १०० डिझेल बसेस २०१८ पासून चालविण्यात येत आहेत. या सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. स्मार्ट सिटीच्या ताफ्यात आणखी १०० ई-बस दाखल झाल्यावर शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार आहे.

Web Title: Chhatrapati Sambhaji Nagar will get 100 electric buses, approved by the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.