छत्रपती संभाजीनगर अन धाराशिव नामांतर आक्षेप डाटा एण्ट्री अंतिम टप्प्यात
By विकास राऊत | Published: April 25, 2023 12:40 PM2023-04-25T12:40:28+5:302023-04-25T12:41:36+5:30
औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याबाबत आक्षेप, हरकती, सूचना मागविल्या होत्या. विभागीय आयुक्तालयाकडे एकूण ७ लाख ४ हजार ६५६ आक्षेप आणि सूचना दाखल झाल्या आहेत. याची छाननी करून डाटा एण्ट्रीचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या आठवड्यात काम पूर्ण होणे शक्य आहे.
औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती. त्यानंतर, राज्याने या नामांतराबाबत २७ मार्चपर्यंत आक्षेप, हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. टपालाद्वारे २ लाख ६९ हजार २४१ तर ईमेलद्वारे ४ हजार ३६४ आक्षेप दाखल झाले आहेत. प्रशासनाने आक्षेप, सूचनांच्या संगणकावरील नोंदणीसाठी ५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. नोंदणीचे काम आता अंतिम टप्प्यात येत आहे. या सूचनांमध्ये काही झेरॉक्स असल्याचे दिसून येत आहे. अशा झेरॉक्स कॉपी बाजूला काढण्यात येत आहेत. तीन ते चार दिवसांत नोंदणीचे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. आक्षेप, सूचनांचे पुढे काय करायचे, याबाबत राज्य शासनाकडून अद्याप निर्देश आलेले नाहीत.