छत्रपती संभाजीनगरचा भाजप उमेदवार अद्याप नक्की नाही; इच्छुक वाढल्याची कराडांची माहिती
By विकास राऊत | Published: March 11, 2024 01:13 PM2024-03-11T13:13:46+5:302024-03-11T13:14:25+5:30
सेवानिवृत्त सनदी अधिकारी, डॉक्टर्स, शासकीय सेवेतील अभियंते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजप लढणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ५ मार्च रोजी झालेल्या सभेतून मिळाले आहेत. भाजपकडून इच्छुक उमेदवारांची यादी वाढत चालली आहे. उमेदवार कोण असणार, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी, डॉक्टर्स, शासकीय सेवेतील अभियंते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे कानावर आले आहे. पक्षाच्या लोकप्रियतेमुळे ते उमेदवारी मागत असावेत; परंतु उमेदवार कोण असेल, हे वरिष्ठ पातळीवरच ठरेल. असे सांगून डॉ. कराड म्हणाले, आचारसंहिता १७ मार्चच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, विकासकामांचे भूमिपूजन, जी कामे झाली आहेत, त्याची उद्घाटने करण्यात येत आहेत.
लोकसभा मतदारसंघात मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. ज्यामध्ये पाणीप्रश्न, पथविक्रेत्यांना सक्षम करणे, महिला सक्षमीकरण, बँक शाखा सुरू करणे, पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केले आहेत. दरम्यान, लोकसभेसाठी पक्षांतर्गत इच्छुकांची यादीही मोठी आहे. तसेच जागा शिंदे गटाला (शिवसेना) सुटावी, याचीही मागणी सुरू आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जागावाटपाचा सगळा तिढा सुटेल, असे बोलले जात आहे.