११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार

By संतोष हिरेमठ | Published: November 30, 2024 07:41 PM2024-11-30T19:41:47+5:302024-11-30T19:42:07+5:30

छत्रपती संभाजीनगरात एका चौकात मिनिटाला धावतात ९५ वाहने

Chhatrapati Sambhajinagar breathless due to 11 lakh vehicles; Ignoring PUC, contributes to pollution | ११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार

११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराच्या हवेची गुणवत्ता संवेदनशील बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गंभीर शेरा असून, शहर राज्यात चौथ्या क्रमाकांवर आहे. धूळ, घनकचरा, प्लास्टिकचा वापर, औद्योगिक वसाहतींसह वाहनांची वाढती संख्या प्रदूषणाला हातभार लावत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरात विविध प्रकारचे रासायनिक घटक असतात, जे आरोग्यासाठी हानीकारक ठरतात.

जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल २२ लाखांवर गेली असून, यातील ५० टक्के वाहने शहरातील रस्त्यांवर धावतात. शहरातील एका चौकात मिनिटाला ९५ वाहने धावत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. यातील अनेक वाहने धूर ओकत धावत होती. सिग्नलवर उभ्या काही वाहनांच्या नंबरवरून ‘पीयूसी’ची पडताळणी केली असता, काही वाहने ‘पीयूसी’शिवाय धावत असल्याचे आढळले. बाहेरगावाहून येणारी अवजड वाहने, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने शहरवासीयांचा ‘श्वास’ कोंडत आहे.

दुचाकीधारकांचे ‘पीयूसी’कडे दुर्लक्षच
प्रत्येक वाहनाची पीयूसी तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु हा नियम केवळ चारचाकींसाठीच असल्याची सध्या तरी परिस्थिती आहे. दुचाकी घेतल्यानंतर पुन्हा कधीच पीयूसी काढली जात नाही. शहरात विनापीयूसी धावणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे.

जुगाड करून मिळते ‘पीयूसी’
एखाद्या वाहनाला ‘पीयूसी’ नाकारणे, हे क्वचितच होते. जुने वाहन असले तरी सहजपणे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र मिळत असल्याची स्थिती आहे. ‘पीयूसी’ देणाऱ्या केंद्रांची तपासणी करण्याची खरी आवश्यकता आहे.

‘पीयूसी’ नसलेल्यांना ७२ लाखांचा दंड
आरटीओ कार्यालयाने एप्रिलपासून आतापर्यंत ‘पीयूसी’ नसलेल्या २ हजार ३६७ वाहनांना ७२ लाख ९० हजार ५०० रुपये दंड ठोठावला. आतापर्यंत ६९ लाख ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

पीयूसी सेंटरची संख्या-४०
जिल्ह्यातील वाहनांची संख्या

डिझेल वाहने - १,२१,४१३
पेट्रोल वाहने- २०,७५,८७७
एलपीजी वाहने- १३,९५८
सीएनजी वाहने- ८,७५०
इलेक्ट्रिक वाहने- ३२,०४५
इतर- ९,६५१

वर्षाला ७० हजार ते ८७ हजार वाहनांची भर
दरवर्षी ७० हजार ते ८५ हजार वाहनांची भर पडत आहे. जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल ८२ हजार ५२९ नवीन वाहने दाखल झाली. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८७ हजार ५६६ नवी वाहने रस्त्यावर आली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांना सवाल
प्रश्न : ‘पीयूसी’ नसलेल्या वाहनांवर काय कारवाई होते?

काठोळे : ‘पीयूसी’ नसलेल्या वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जाते. ‘पीयूसी’ नसेल तर वाहन मालकाला २ हजार रुपये दंड होतो. वाहन अन्य व्यक्ती चालवत असेल तर ४ हजार रुपये दंड होतो.

प्रश्न : शहरात धूर सोडत धावणारी वाहने दिसतात?
काठोळे : प्रत्येक वाहनधारकांनी ‘पीयूसी’ काढावी. वाहन धूर सोडत असेल तर दुरुस्ती केली पाहिजे. त्यानंतर ‘पीयूसी’ काढावे.

प्रश्न : जुन्या वाहनांची संख्या अधिक आहे का?
काठोळे : जुन्या वाहनांचे प्रमाण कमी आहे. वाहन संख्या सुरुवातीपासूनची आहे. त्यातील अनेक वाहने आज रस्त्यावर नाहीत. जुन्या वाहनांची संख्या खूप कमी आहे.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar breathless due to 11 lakh vehicles; Ignoring PUC, contributes to pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.