छत्रपती संभाजीनगर बनू शकते ‘कॅरी ॲण्ड फॉरवर्डिंग’ हब; व्यापाऱ्यांचे थेट दिल्लीतून प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:53 PM2024-10-14T12:53:38+5:302024-10-14T13:04:36+5:30
छत्रपती संभाजीनगर राज्यात मध्यवर्ती ठिकाणी; बड्या कंपन्यांच्या गुंतवणुकीने शहरात पुन्हा औद्योगिक क्रांती अन् 'समृद्धी'ची कनेक्टीव्हिटी ठरतेय फायद्याची
छत्रपती संभाजीनगर : शहराला लागून जाणारा समृद्धी महामार्ग ‘इकाॅनॉमिक कॉरिडोर’ बनला आहे. मुंबई व नागपूर शहराचा केंद्रबिंदू आता छत्रपती संभाजीनगर ठरत आहे. यामुळे भौगोलिक स्तरावरही हे शहर आणखी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अंतर कमी झाल्याने औद्योगिक वसाहतीतील उत्पादने काही तासांत कुठेही पोहोचू शकतात. याचा फायदा शेंद्रा-बिडकीन-वाळूज येथील उद्योगांनाच नव्हे, तर गुजरात-मध्य प्रदेशापर्यंत होऊ शकतो. यासाठी शहरालगतच्या माळीवाड्यात ‘सी ॲण्ड एफ हब’ (कॅरी ॲण्ड फॉरवर्डिंग) उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या वतीने थेट दिल्लीतून यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बड्या कंपन्यांच्या गुंतवणुकीने शहरात पुन्हा औद्योगिक क्रांती
दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. राज्य सरकारसोबत सामंजस्य करार करण्यात आलेल्या टोयोटो-किर्लोस्कर, एथर एनर्जी, लुब्रिझोल या कंपन्यांची एकापाठोपाठ गुंतवणूक करीत जमीन घेतली. नुकतेच जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनीने ऑरिक सिटीत गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला. यामुळे उद्योग जगतात छत्रपती संभाजीनगरचे महत्त्व वाढले आहे.
सी ॲण्ड एफ हब कशासाठी?
छत्रपती संभाजीनगर शहर महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील डीएमआयसी, रेल्वे, विमान कनेक्टिव्हिटीसह महामार्गाचे जाळे वाढले आहे. मुंबई-नागपूरच नव्हे, तर पश्चिम भारतातील गुजरात, मध्य प्रदेशात कमी वेळेत पोहोचता येते. येथे कंपन्यांसाठी लागणारा कच्चा माल साठवणूक व वितरणाचे ‘कॅरी ॲण्ड फॉरवर्डिंग’ (सी ॲण्ड एफ) हब झाले तर उद्योग व व्यापाराला मोठी गती मिळेल.
माळीवाडाच का ?
शहरातून दोन नॅशनल हायवे जातात. शहराच्या उत्तर बाजूने जाणारा समृद्धी महामार्ग व दक्षिण बाजूच्या सोलापूर-धुळे महामार्गामुळे रस्ता मालवाहतुकीला वेग आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही महामार्ग याच माळीवाडा परिसरातून जातात. माळीवाडा येथे कंटेनर डेपो आहे. यामुळे ‘सी ॲण्ड एफ’ हबसाठी माळीवाडाच योग्य ठिकाण आहे.
जमिनीची उपलब्धता
मुंबई, पुणे, नागपूर, इंदूर, अहमदाबादपेक्षा शहरात जमिनीची उपलब्धता मोठी आहे. जमिनीच्या किमती त्या तुलनेत कमी आहेत. दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक उद्योगांना व होलसेल व्यापाऱ्यांना मोठी बाजारपेठ बनविण्यासाठी हे शहर उपयुक्त ठरणार आहे. कंपन्यांनाही आपल्या उत्पादनाचा येथे साठा करून वितरण करणे सोपे जाणार आहे.
शहराच्या जमेच्या बाजू
ऑटोमोबाईल हब, फार्मास्युटिकल हब, बीअर हब येथे आहे. डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा, बिडकीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत, जालना येथील स्टील व सीडस् हब, ड्रायपोर्ट हे येथील औद्योगिक क्षमता दर्शविते.
नव्याने प्रस्ताव पाठविला
माळीवाड्यात सी ॲण्ड एफ हब झाले तर मराठवाड्याच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. कॅट संघटनेचे राष्ट्रीय महासचिव व दिल्ली येथील खा. प्रवीण खंडेलवाल हे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालय संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत. त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. नव्याने प्रस्तावही पाठविला आहे.
- अजय शहा, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट