छत्रपती संभाजीनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबरच; जिल्हाध्यक्ष नॉट रिचेबल!
By स. सो. खंडाळकर | Published: July 4, 2023 01:14 PM2023-07-04T13:14:17+5:302023-07-04T13:14:45+5:30
स्वत: सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांचे अनेकांना वैयक्तिक फोन
छत्रपती संभाजीनगर : शहर राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारांबरोबरच राहणार असल्याचे सोमवारी शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी जाहीर केले. तर जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे कालपासूनच नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय हे समजू शकले नाही. दरम्यान, सोमवारी शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांना स्वत: सुप्रिया सुळे यांनी मोबाईलद्वारे संकर्प साधून त्यांचा कल जाणून घेतला. कालपासून स्वत: जयंत पाटीलही अनेकांना मोबाईल करीत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रा. किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहोत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ५ जुलै रोजी आयोजित बैठकीचे निमंत्रण आम्हालाही आहे. मी, द्वारकाभाऊ पाथ्रीकर व विजयअण्णा बोराडे सर्व जण या बैठकीस उपस्थित राहणार आहोत.
मी सोमवारी दिवसभर कन्नड मतदार संघात होतो. कार्यकर्ते आणि सामान्य माणसांमध्ये शरद पवार यांच्याबद्दलची आस्था बघावयास मिळाली, असेही प्रा. पाटील यांनी नमूद केले. माजी खासदार जयसिंगकाका गायकवाड म्हणाले, शरद पवार एके शरद पवार. आमचा दुसरा कुणी नेता नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हणाले, आम्ही शरद पवार यांचे निष्ठावान आहोत. अजित पवार यांची गद्दारी लोकांना मान्य नाही. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील म्हणाल्या, शरद पवार यांचा त्याग, जनमानसातील त्यांची प्रतिमा लक्षात घ्यायला हवी. या वयात असा त्रास त्यांना व्हायला नको होता. ईडीच्या भीतीने ग्रासलेली व कमर्शियल माइंडची मंडळीच अजित पवार यांच्याबरोबर जातील.
कैलास पाटील हे पूर्वी शिवसेनेत होते. छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली, तेव्हा ते त्यांच्याबरोबर होते. ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचे वर्णन छगन भुजबळ यांचा कार्यकर्ता असेच करण्यात आले. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या जवळचे अशी त्यांची प्रतिमा बनली. ते सांगतील तेवढेच ते काम करू लागले. याबाबत तक्रारीही वाढल्या. आता छगन भुजबळ व सतीश चव्हाणही अजित पवार यांच्यासमवेत असल्यामुळे कैलास पाटीलही त्यांच्यासमवेतच असणार, असा राजकीय होरा व्यक्त होत आहे.