छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सद्य:स्थितीत २५३ क्रियाशील कुष्ठरोगी, नोव्हेंबरपासून रुग्ण शोधमोहीम
By विजय सरवदे | Published: October 7, 2023 12:27 PM2023-10-07T12:27:34+5:302023-10-07T12:28:00+5:30
केंद्र शासनाने शाश्वत विकासध्येयांतर्गत २०२३ पर्यंत शून्य कुष्ठरोग संसर्ग ही संकल्पना देशात राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सद्य:स्थितीत २५३ क्रियाशील कुष्ठरोगी असून, याचे हजारी प्रमाण ०.५९ एवढे आहे. दरम्यान, या रोगाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा धोरणात्मक आराखडा तयार करण्यात आला असून, नोव्हेंबरपासून या रुग्णांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हा धोरणात्मक आराखड्याचे विमोचन बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सांगितले की, कुष्ठरोग हा एक सांसर्गिक त्वचारोग असून, प्राचीन काळापासून तो अस्तित्वात आहे. पूर्वी या रोगावर उपचार उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वाळीत टाकण्याचे प्रकार होत असत. या रोगावर सुरुवातीला ‘डॅप्सोन’ नावाची एकच औषधी होती. आधुनिक शास्त्रामध्ये बरीच प्रगती झाल्यामुळे आता बहुविध औषधोपचार पद्धतीचा वापर केला जात असून, हा आजार बरा होत आहे.
केंद्र शासनाने शाश्वत विकासध्येयांतर्गत २०२३ पर्यंत शून्य कुष्ठरोग संसर्ग ही संकल्पना देशात राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रथम जिल्हा, नंतर तालुका व त्यानंतर गाव, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शून्य कुष्ठरोग संसर्ग अभियान सर्व स्तरावरून राबविण्यात येणार आहे. त्यानुसार खुलताबाद व फुलंब्री तालुक्यात २०२३-२४ मध्ये, वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी सन २०२४-२५ मध्ये, छत्रपती संभाजीनगर, पैठण व सिल्लोड तालुक्यांमध्ये सन २०२५-२६ मध्ये, तर कन्नड व सोयगाव या तालुक्यांत सन २०२६-२७ असे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते.