पाच महिने अगोदरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा
By विजय सरवदे | Published: November 8, 2023 03:56 PM2023-11-08T15:56:44+5:302023-11-08T15:57:28+5:30
जिल्हा परिषदेने तीन महिन्यांसाठी केला २२ कोटींचा कृती आराखडा
छत्रपती संभाजीनगर : साधारणपणे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसत असतात. मात्र, यावेळी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील ७८ गावे व ६ वाड्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र यावरून दिसते. तथापि, पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने डिसेंबरपर्यंत २२ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे.
यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे जिल्ह्यातील नद्या, बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाच महिने अगोदरच अनेक गावे, वाड्या, तांड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. आजच्या घडीला ७८ गावे व ६ वाड्यांसाठी ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यापुढे टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी रोज वाढत जाईल. मागच्या वर्षी जिल्ह्यातील मोजक्याच गावांना टंचाई जाणवली. त्यांच्यासाठी अवघ्या दोनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.
दरम्यान, हिवाळ्यातील पाणीटंचाईसाठी जिल्हा परिषदेला अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नियोजन करावे लागले. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत विहिरी अधिग्रहण, टँकर, विंधन विहिरींची दुरुस्ती, नदीपात्रात बुडक्या घेण्यासाठी २२ कोटी १० लाख ५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील सर्वाधिक गावे तहानलेली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगाव, सांजखेडा, एकलहरा, महमदपूर, जोडवाडी, पांढरीतांडा, पांढरीपिंपळगाव, घारदोन, कन्नोनाईक तांडा, बेगानाईक तांडा, दरकवाडी, खामखेडा, करंजगाव, कोनवाडी, जडगाव २, डायगव्हाण, कौडगाव जालना, काऱ्होळ, भिंदोन, हिरापूर, वडाचीवाडी, लालवाडी, कचनेर, डोणवाडा, पिंपळखुटा, कंचनापूर, गोकुळवाडी, पांढरीतांडा, पांढरीतांडा १, शेंद्राकमंगर अंतर्गत शिवाजीनगर, पैठण तालुक्यातील आडूळ बु., आडूळ खु., आंतरवालीखांडी, ब्राम्हणगाव, ब्राम्हणगाव तांडाढ, गेवराई मर्दा, गेवराई खु., गेवराई बु., अब्दुल्लापूर, होणोबाची वाडी, एकतुनी, रजापूर, हिरापूर, थापटीतांडा, पारुंडीतांडा, आडगाव जावळे, दाभरुळ, कडेठाण खु., दादेगाव खु., दादेगाव बु., दरेगाव, देवगाव, देवगाव तांडा, तुपेवाडी तांडा, सुंदरवाडी, चिंचाळा, मिरखेडा, केकतजळगाव, हर्षी बु. चौंडाळा आदी गावांचा समावेश आहे.
टंचाईची तीव्रता वाढणार
सध्या ८४ गावांत पाणीटंचाई आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील २३६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडतील, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाने लावला आहे. त्यासाठी २४२ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार असून पाणीपुरवठा करण्यासाठी २४५ टँकरचे नियोजन करण्यात आले आहे.