छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दूध अनुदानापोटी महिनाभर दररोज मिळणार २०.५३ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:51 PM2024-01-13T12:51:15+5:302024-01-13T12:51:54+5:30
आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दूध व्यवसायाचा आधार आहे.
- जयेश निरपळ
गंगापूर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यभर दूध दराचा प्रश्न पेटला असताना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याला महिनाभर दररोज जवळपास २० लाख ५३ हजार रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहे. यासाठी दुभत्या गायी मालकांना अनेक अटी, शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे.
मागील काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा सुरू असल्याने शेती उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दूध व्यवसायाचा आधार आहे. शेतीला पूरक असा हा व्यवसाय चांगला वाढत चाललेला असतानाच सध्या दुधाचे दर कोसळले आहेत. त्यामुळे प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणी दूध उत्पादक आणि शेतकरी संघटना, विविध संघटनेचे पदाधिकारी, राजकीय लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्यानंतर प्रति लिटर ५ रुपये अनुदान गाईच्या दुधाला देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. सुरुवातीला अनुदान देण्याबाबत निर्णय जाहीर करताना त्यात संबंधित दूध हे सहकारी दूध संघालाच विक्री झालेले असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली होती; मात्र, जिल्ह्यासह सर्वत्रच शेतकरी अनेक खासगी दूध प्रकल्पांना दूध घालत असल्याने सरसकट अनुदान द्यावे, अशी मागणी पुढे आल्याने आता सहकारीसह खासगी दूध प्रकल्पांना दूध देणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात येणार असल्याचा सुधारित आदेश संबधित विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दररोज ४ लाख १० हजार लिटर दुधाचे संकलन
जिल्ह्यात दररोज ४ लाख १० हजार ६६० लिटर गायीच्या दुधाचे संकलन होत आहे. यामध्ये जिल्हा सहकारी दूध संघाच्या ३७९ संस्थामार्फत ६५ हजार लिटर तर १७ खासगी दूध संकलन केंद्रातून ३ लाख ४५ हजार ६६० लिटर दुधाचे संकलन होते.
असे आहे ५ रुपये मदतीचे स्वरूप
सहकारी, खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पांना दुग्धविकास आयुक्तांकडे अर्ज करावा लागणार आहे. ३.५ फॅट व ८.५ एसएमएफस गुणप्रतीच्या दुधास २७ रुपये ऑनलाइन स्वरूपात अदा करणे आवश्यक आहे. तदनंतर डिबीटीद्वारे ५ रुपयांचे वितरण होणार आहे. यासाठी विशेष बॅंक सॉफ्टवेअर कार्यान्वित करून डीबीटी त्या बँक खात्यास उत्पादकांचे आधार व पशुधनाचे आधार लिंक करणे बंधनकारक आहे.
एक महिना मिळणार अनुदान
११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या दरम्यान, शासकीय अनुदान मिळणार असून, त्यानंतर याविषयी शासनदरबारी चर्चा होणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी गायीचे दूध उत्पादकांना एक महिना याचा फायदा होणार आहे.
सरकारने लादल्या जाचक अटी
पशुधनाचे आधार कार्ड शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी लिंक असणे, शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे तसेच दुधाळ जनावरांची नोंदणी आयएनएपीएचच्या पोर्टलवर करणे, शेतकऱ्यांच्या आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्याची नोंदणी आयएनएपीएचच्या पोर्टलवर करणे यासह इतर जाचक अटी सरकारने यात लादल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे दूध हे घरातील एका व्यक्तीच्या नावावर जाते तर गायीची नोंद घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे. यामुळे अनुदान मिळण्यास अडचण येणार आहे. यासह वैजापूर व गंगापूर तालुक्यातील अनेक शेतकरी नगर जिल्ह्यातील संस्थाना दूध देतात. त्यामुळे त्यांना अनुदान कसे मिळणार ? हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.