बाळाचे बारसे करून पुण्याला निघाले अन्...; 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह'ने घेतला चौघांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:14 AM2024-09-14T11:14:54+5:302024-09-14T11:20:47+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूजजवळील पथकर नाक्यावर कार व जीपचा भीषण अपघात झाला. मद्यपान करून गाडी चालवताना नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारवर धडकली. 

chhatrapati sambhajinagar drunk and drive Accident update four killed after scorpio hit | बाळाचे बारसे करून पुण्याला निघाले अन्...; 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह'ने घेतला चौघांचा जीव

बाळाचे बारसे करून पुण्याला निघाले अन्...; 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह'ने घेतला चौघांचा जीव

वाळूज महानगर : लग्नानंतर दहा वर्षांनी घरात पाळणा हलला. बाळाचे बारसे करून कुटुंब आनंदात पुण्याला निघाले, पण वाटेतच अपरित घडले. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या अक्षम्य चुकीमुळे चौघांना जीव गमवावा लागला. हा भीषण अपघात शुक्रवार (१३) सायंकाळी ४ वाजता वाळूजजवळील पथकर नाक्याजवळ घडला.

अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणारी भरधाव जीप दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर धडकल्याने गंभीर जखमी तीन महिला व एका ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Drunk and Drive Accident : अपघात कसा घडला?
 
अजय अंबादास बेसरकर (४०) हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या पुण्यात स्थायिक झाले आहेत. शुक्रवारी ते पत्नी मृणालिनी, ६ महिन्यांचा चिमुकला, सासू आशा पोपळघट (६५), मेव्हणी शुभांगिनी सागर गिते (३५) व मेव्हणीची मुलगी दुर्गा सागर गिते (७) यांच्यासह कारने (एमएच २७ बीझेड ००४५) संभाजीनगरमार्गे पुण्याला जात होते. 

वाळूजजवळील शिवराई पथकर नाक्याजवळ सायंकाळी ४ वाजता अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव जाणाऱ्या स्कार्पिओ जीपच्या (एमएच १२ केजे ४१३४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या बेदरकर यांच्या कारवर जाऊन धडकली. 

कारमधील चालक, दोन महिला व दोन लहान मुले गंभीर जखमी होऊन अडकून पडली. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत वाळूज पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

स्कॉर्पिओ चालकासह दोघे फरार

मृणालिनी, आशालता, दुर्गा सागर गिते व एका चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अजय, शुभागिनी हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर जीपचा चालक व त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेले.

पोलिसांनी दोघांनाही केली अटक

दरम्यान, पोलिसांनी फरार झालेल्या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. विशाल ऊर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२, रा. बकवाल नगर वाळूज, ता. गंगापूर), कृष्णा कारभारी केरे (वय १९, बकवाल नगर वाळूज) अशी आरोपींची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव चव्हाण हा चालक होता. पण, त्याने लायसन्स नसताना आणि मद्यपान केलेल्या कृष्णा केरे याला गाडी चालवायला दिली. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

Web Title: chhatrapati sambhajinagar drunk and drive Accident update four killed after scorpio hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.