माजी महापौरांचा बूट मोकाट श्वानाने उचलून नेला; १५ हजारांच्या बुटासाठी पालिका यंत्रणेची धावपळ
By मुजीब देवणीकर | Published: June 13, 2023 12:59 PM2023-06-13T12:59:01+5:302023-06-13T12:59:42+5:30
महापालिका यंत्रणेने काही मोकाट श्वानास पकडले पण माजी महापौरांचा बूट गायब आहे
छत्रपती संभाजीनगर : माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे ईटखेडा येथे खासगी निवासस्थान आहे. शनिवारी रात्री मोकाट श्वानाने त्यांच्या घरासमोर ठेवलेले १५ हजार रुपयांचे बूट उचलून नेले. बूट सापडत नसल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी श्वान सापडला. त्याचा शोध घेण्यासाठी महापालिकेची श्वान पकडणारी गाडी बोलावण्यात आली. परिसरात चार मोकाट श्वानही पकडण्यात आले. मात्र, श्वान कसा सांगेल की, बूट कुठे टाकला हे?
त्याचे झाले असे की, घोडेले यांनी एका मॉलमधून हौसेने १५ हजार रुपयांचा बूट खरेदी केला. बूट घेऊन काही दिवसच झाले होते. सवयीप्रमाणे त्यांनी शनिवारी रात्री घराबाहेर बूट काढला. रात्री झोपताना घराच्या वॉल कम्पाउंडचा दरवाजा बंद केला नाही. त्यामुळे रात्री काही मोकाट श्वान घरात घुसले. अगोदर श्वानांनी घराच्या आजूबाजूला फिरून परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर एक जण प्रवेशद्वारावर उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या दुसऱ्या साथीदाराने मोठ्या शिताफीने घोडेले यांचा एक बूट उचलून नेला. हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले.
रविवारी श्वान पकडणारी गाडी बोलावण्यात आली. गाडी पाहून श्वानांनी धूम ठोकली. मात्र, इतर चार श्वान पकडले गेले. बूट उचलून नेणाऱ्या श्वानासारख्याला पकडले. आता तोच खरा श्वान आहे, का? ज्याने बूट नेले हे महापालिकाही ठामपणे सांगू शकत नाही. आता पकडलेले श्वान कोंडवाड्यात आहेत. मात्र, बूट कोणी उचलून नेला, कुठे टाकला हे श्वान थोडीच सांगणार आहे? या घडलेल्या घटनेला नंदकुमार घोडेले यांनी मात्र दुजोरा दिला आहे.