नियम तोडला चारचाकीने, दंड ठाेठावला दुचाकीला!; छत्रपती संभाजीनगरमधील अजब प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:15 AM2024-07-08T09:15:54+5:302024-07-08T09:25:50+5:30
अतिवेगाने धावणाऱ्या चारचाकी वाहनाचा दंड चक्क माजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या मुलाच्या दुचाकीला
छत्रपती संभाजीनगर : अतिवेगाने धावणाऱ्या चारचाकी वाहनाचा दंड चक्क माजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या मुलाच्या दुचाकीला ठोठावण्यात आला आहे. हा प्रकार पाहून हे माजी अधिकारीही आश्चर्यचकित झाले.
माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांचे पुत्र सुशील शेळके यांच्या नावावर दुचाकी (एमएच-१४, बीव्ही-१८००) आहे. त्यांना अतिवेगाने वाहन चालविल्याप्रकरणी ऑनलाइन दंडाची पावती आली. ऑनलाइन पावतीत त्यांच्या दुचाकीचा क्रमांक नमूद होता. मात्र, छायाचित्र चारचाकीचे दाखविण्यात आले. या चारचाकीवर एमएच-१४, जेव्ही-१८०० असा क्रमांक नमूद आहे. असे असतानाही सुशील शेळके यांच्या दुचाकीला दंडाची पावती पाठविण्यात आली.
सुशील शेळके यांनी या सगळ्या प्रकाराविषयी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली. वेगवान चारचाकी वाहनाचा दंड दुचाकीला देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून नंबर तपासला जात नाही, असे त्यांनी नमूद केले.