छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिराच्या जागेत १९०० चौ. फुटांची भर
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 18, 2024 03:24 PM2024-07-18T15:24:32+5:302024-07-18T15:25:07+5:30
पुढील दोन वर्षात उभारणार ग्रामदैवताचे दोन मजली भव्य मंदिर
छत्रपती संभाजीनगर : शहराचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिराची जागा मागील चार वर्षात वाढली, हा काही चमत्कार नव्हे. विश्वस्त मंडळाने मंदिरासाठी आजूबाजूची १९०० चौ.फूट जागा खरेदी केली आहे. आणखी जागा खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या दोन वर्षात दोन मजली मंदिर उभारण्याचा मानस विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धाराला ३९ वर्षे पूर्ण
शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती ३५० वर्षे जुने आहे. येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापासून ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्व महान नेत्यांनी येऊन गणपतीचे दर्शन घेतले. १९८४-१९८५ यावर्षी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बजरंगलाल शर्मा हे असताना मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. ३५० चौ. फुटांचे हे संपूर्ण मंदिर संगमरवरी करण्यात आले. यास आता ३९ वर्षे पूर्ण होत आहेत.
जागेची भर
सध्या मंदिरात एकाच वेळी १० भाविकही उभे राहू शकत नाहीत. जागा अपुरी पडत असल्याने विश्वस्तांनी मंदिराच्या दक्षिण व पश्चिम बाजूची जागा विकत घेण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये दक्षिण बाजूची १२०० चौ. फूट जागा विकत घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी आणखी ७०० चौ. फूट जागा मंदिराला विकत मिळाली. अशी १९०० चौ.फूट जागा व मूळची ३५० चौ. फूट जागा अशी सुमारे २२५० चौ.फूट जागा आहे.
उभारणार भव्य मंदिर
पश्चिम बाजूच्या कोपऱ्यातील आणखी ७०० चौ.फूट जागा खरेदीचा विश्वस्तांचा प्रयत्न सुरू आहे. तांत्रिक अडचणीमुळे निर्णय लांबत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यास वर्षाच्या आत मंदिराकडे २९५० चौ.फुटांची जागा असेल.
उभारणार २ मजली मंदिर
ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिराचा आकार वाढावा यासाठी छत्रपती संभाजीनगरातील भाविकांची इच्छा आहे. आणखी ७०० चौ. फूट जागा मिळाल्यावर दोन मजली भव्य मंदिर उभारण्याचे काम लगेच सुरू करण्यात येईल. खालील बाजूस मंदिर व वरील मजल्यावर मोठा हॉल व विश्वस्त कार्यालय असेल.
- प्रफुुल्ल मालाणी, सचिव, संस्थान गणपती मंदिर, ट्रस्ट.
वज्रलेपनातून दिसले मूर्तीचे १०० वर्षांपूर्वीचे मूळ रूप
२०२२ या वर्षी संस्थान गणपतीचे वज्रलेपन करण्यात आले. जेव्हा शेंदराचा थर काढण्यात आला. तेव्हा १०० वर्षांपूर्वीचे मूर्तीचे मूळ रूप समोर आले.