मुंबईतील विमानांच्या गर्दीचा फटका छत्रपती संभाजीनगरला, मुंबईचे विमान मार्चपासून ‘जमिनीवर’
By संतोष हिरेमठ | Published: February 15, 2024 07:24 PM2024-02-15T19:24:35+5:302024-02-15T19:25:03+5:30
हवाई कनेक्टिव्हिटीत होणार घट : प्रवासी, पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना बसणार फटका
छत्रपती संभाजीनगर : सकाळच्या वेळेतील एअर इंडियाची मुंबई - छत्रपती संभाजीनगर- मुंबई विमानसेवा १ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन प्रणालीत ही विमानसेवा काढूनही टाकण्यात आली आहे. २९ फेब्रुवारी उड्डाण घेणारे एअर इंडियाचे सकाळच्या वेळेतील शेवटचे विमान ठरणार आहे. त्यामुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत घट होणार असून, प्रवासी, पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे.
विमानांची गर्दी कमी करण्यासाठी आणि वेळेवर उड्डाण होण्यासाठी सरकारने मुंबई विमानतळाला नियोजित उड्डाणांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. या निर्णयाचा छत्रपती संभाजीनगरला फटका बसला आहे. सध्या इंडिगो आणि एअर इंडियाच्या माध्यमातून मुंबईसाठी सकाळी दोन आणि सायंकाळी एक, अशा एकूण तीन विमानसेवा सुरू आहेत. तिन्ही विमाने प्रवाशांच्या गर्दीने ‘फुल्ल’ असतात. मात्र, आता एअर इंडियाचे विमान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मार्चपासून मुंबईसाठी सकाळी एक आणि सायंकाळी एक, अशी दाेनच विमाने उपलब्ध राहणार आहेत.
टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीने दिलेले निवेदन....
ज्योतिरादित्य सिंधिया, नागरी विमान वाहतूक मंत्री, नवी दिल्ली
मुंबई - छत्रपती संभाजीनगर - मुंबई मार्गावरील एअर इंडियाच्या विमानाचा सकाळचा स्लॉट कायम ठेवावा. कारण, या सेक्टरवरील फ्लाइट्समध्ये कपात केल्यास अनेक परदेशी पर्यटकांच्या आगामी प्रवासाचे नियोजन विस्कळीत होईल. पर्यटकांचे ग्रुप, कॉर्पोरेट क्लायंट, व्यावसायिक, आगामी दिवसातील परिषद, विद्यार्थ्यांच्या प्रवासावर परिणाम होईल. अनेकांनी मार्च, एप्रिल आणि त्यापुढील महिन्यांतील प्रवासासाठी अनेक महिने अगोदर त्यांच्या जागा बुक केल्या आहेत. उड्डाणे कमी करण्याच्या या शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाचा केवळ पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रावरच नाही, तर छत्रपती संभाजीनगर शहर आणि आसपासच्या व्यापार, वाणिज्य आणि उद्योगावरही वाईट परिणाम होईल.
पर्यटन, व्यापार, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व भागधारकांच्या हितासाठी मुंबई - छत्रपती संभाजीनगर - मुंबई सेक्टरवरील एअर इंडियाच्या फ्लाइटचा सकाळचा स्लॉट पुन्हा द्यावा.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन