छत्रपती संभाजीनगरची ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप; एअर ॲम्ब्युलन्सने थेट विदेशातून रुग्ण शहरात

By संतोष हिरेमठ | Published: November 3, 2023 06:58 PM2023-11-03T18:58:28+5:302023-11-03T18:59:35+5:30

रुग्णांना काही तासांत रुग्णालयात पोहोचणे झाले शक्य

Chhatrapati Sambhajinagar Leaps Towards 'Medical Hub'; Air Ambulance directly from abroad to patient city | छत्रपती संभाजीनगरची ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप; एअर ॲम्ब्युलन्सने थेट विदेशातून रुग्ण शहरात

छत्रपती संभाजीनगरची ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप; एअर ॲम्ब्युलन्सने थेट विदेशातून रुग्ण शहरात

छत्रपती संभाजीनगर : ‘लाइफ सेविंग’ उपचार आता शहरात सहज मिळत आहे. उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकरांना पुणे, मुंबई, हैदराबादला जाण्याची गरज उरलेली नाही. इतकेच काय शहरात एअर ॲम्ब्युलन्सची सेवाही आता ‘टेकऑफ’ घेत आहे. अगदी देशभरासह थेट विदेशातून रुग्ण एअर ॲम्ब्युलन्सने शहरात दाखल होत आहेत.

शहराने ‘मेडिकल हब’च्या दिशेने झेप घेतली आहे. आरोग्य सुविधांसाठी शहराने वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय सेवेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ अनेक काॅर्पोरेट रुग्णालये उभी राहिली आहेत. जानेवारी २०१६ मध्ये शहरात पहिले अवयवदान झाले. मात्र, दाता असतानाही केवळ शहरातून एअर ॲम्ब्युलन्स सेवा नसल्याने एका रुग्णाला हृदयापासून मुकावे लागले होते. या सेवेअभावी दात्याचे हृदय वाया गेले. याच वेळी एअर ॲम्ब्युलन्सचे महत्त्व समोर आले आणि ही सेवा देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. त्यातून शहरातील रुग्णांना अन्य शहरात आणि अन्य शहरातील रुग्णांना छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारासाठी वेळीच दाखल होणे शक्य होत आहे.

शारजाहहून रुग्ण सोडतीन तासात थेट शहरात
शाहजाह येथे पर्यटनासाठी गेलेला तरुण पडला आणि त्यात त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला उपचारासाठी शहरात आणण्याचा निर्णय झाला. शारजाह येथे ७२ तास उपचार केल्यानंतर एअर ॲम्ब्युलन्सने तरुणाला आणण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी शहरासह मुंबईतील काहींनी प्रयत्न केले आणि शारजाहहून पुणेमार्गे एअर ॲम्ब्युलन्सने रुग्णाला बुधवारी रात्री शहरात आणण्यात आले. अवघ्या सोडतीन तासात एअर ॲम्ब्युलन्स शहरात पोहोचली.

अर्ध्या तासात लिव्हर, किडनी अर्ध्या तासात शहरात
नांदेड येथील ब्रेनडेड रुग्णाची किडनी आणि लिव्हर घेऊन ८ ऑक्टोबर रोजी अवघ्या अर्ध्या तासात एअर ॲम्ब्युलन्स छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर केवळ ७ मिनिटांत विमानतळावरून रुग्णवाहिकेने हे अवयव प्रत्यारोपणासाठी बीड बायपासवरील खाजगी रुग्णालयात दाखल झाले.

वर्षभरात किमान १० उड्डाणे
शहरातून पर्यटनासाठी शारजाह येथे गेलेल्या एका तरुणाला उपचारासाठी तातडीने एअर ॲम्बुलन्सने छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले. यासाठी मंदार भारदे यांचे सहकार्य मिळाले. शहरातून देशभरात आणि देशभरातून शहरात एअर ॲम्बुलन्सने रुग्णांची वाहतूक होत आहे. वर्षभरात किमान १० उड्डाणे होतात, अशी माहिती खासगी विमानसेवेचे संचालक सुबोध जाधव यांनी सांगितले.

खासगी रुग्णालये किती?
- शहरात खासगी रुग्णालये- ५५०
- ग्रामीण भागात तालुकास्तरावर खासगी रुग्णालये -३३३

Web Title: Chhatrapati Sambhajinagar Leaps Towards 'Medical Hub'; Air Ambulance directly from abroad to patient city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.