छत्रपती संभाजीनगर लोकसभेची सीट केवळ शिवसेनेचीच; भाजपच्या तयारीवर भूमरेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:41 PM2023-05-06T12:41:23+5:302023-05-06T12:42:16+5:30
भाजपकडून राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेची सीट ही शिवसेनेचीच आहे. ही जागा जिंकण्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. मित्रपक्षही या मतदार संघातून तयारी करीत असला तरी या जागेवर शिवसेनेचाच हक्क असल्याचे राज्याचे रोजगार हमी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार संघ म्हणून ओळखला जातो. मात्र २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांनी पराभूत केले होते. नऊ महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि जिल्ह्यातील पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झाले. अशा परिस्थितीत भाजपकडून राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, भाजपने प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी एका केंद्रीय मंत्र्याची संपर्कमंत्री म्हणून नेमणूक केली. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर नजर ठेवून पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही मतदार संघातील जनतेशी संपर्क वाढविल्याने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. मध्यंतरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या ४० जागा शिवसेनेला देण्यात येतील, असे विधान केले होते. त्या विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री भूमरे यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच असल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीने निर्विवाद विजय संपादन केल्याने शिवसेनेचा विश्वास दुणावला आहे. लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क असल्याचे पालकमंत्र्यांनी निक्षून सांगितले.
ना राहील महाविकास आघाडी, ना वज्रमूठ
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, नाना पटोले आणि अजितदादा पवार यांनी संजय राऊतांवर केलेली टीका आणि राऊतांची बडबड पाहता आता महाविकास आघाडी राहणार नाही आणि यापुढे त्यांच्या वज्रमूठ सभाही होणार नसल्याचा दावा भूमरे यांनी केला.