छत्रपती संभाजीनगरची जागा 'वंचित'चीच; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनेने आघाडीत खळबळ
By स. सो. खंडाळकर | Published: March 15, 2024 11:27 AM2024-03-15T11:27:40+5:302024-03-15T11:28:35+5:30
महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभेची जागा ही वंचित बहुजन आघाडीची असून ती आम्ही जिंकलेली असल्याने आम्ही सोडणार नसल्याचे जाहीर करून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त घोषणा केली परंतु उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे. यावेळी आपण अकोल्यातून एकाच ठिकाणाहून लढणार आहोत. अमरावतीहून सुजात आंबेडकर यांनी लढावे असा जनतेचा आग्रह आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत हे नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत? उबाठाचे, शरद पवारांचे की काँग्रेसचे असा सवाल उपस्थित करीत त्यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला.
यावेळी डॉ. धैर्यवान पुंडकर,सिद्धार्थ मोकळे, प्रभाकर बकले, योगेश बन, ॲड. लता बामणे, महेश निनाळे, पंडितराव तुपे, रवी तायडे, सय्यद जफर आदींची उपस्थिती होती.
मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा,संपवण्याचा प्रयत्न होईल
मनोज जरांगेंना संपवण्याचा प्रयत्न होईल. त्यांना बदनाम केले जाईल. नजीकच्या काळात मॉर्फिंग करून त्यांना अश्लील स्वरूपात दाखवण्यात येईल, त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये, असे खळबळजनक आवाहन ॲड. आंबेडकरांनी केले. ते म्हणाले, मनोज जरांगे यांचे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाला काबूत घेता आले नाही. नाना तऱ्हेने ते दाबण्याचा प्रयत्न होत आहे. माझी अधिकृत माहिती आहे की, जरांगे पाटील यांचा व्हिडीओ तयार करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यांच्या समर्थकांना विचलित करण्याचा यातून प्रयत्न होणार आहे. हे अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले जाणार आहे. मी हा व्हिडीओ पाहिला नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वत: जरांगे पाटील यांनीही याबद्दलची दक्षता घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. आंबेडकर पुढे म्हणाले, अशा बदनामीपासून वाचण्यासाठी आता जरांगेंनी राजकीय प्रवास सुरू केला पाहिजे. जे आरक्षण मिळाले आहे, ते टिकवण्याची पहिली जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्याच समाजातून विरोध करणाऱ्यांनाही हेच उत्तर राहील. जरांगेंमुळे प्रस्थापित मराठ्यांना धक्का बसू शकतो. अधिक उमेदवार करण्यामुळे ईव्हीएम बाद होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे ते म्हणाले.