अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
By बापू सोळुंके | Updated: April 13, 2025 22:02 IST2025-04-13T22:01:06+5:302025-04-13T22:02:48+5:30
खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही - संदिपान भुमरे

अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
छत्रपती संभाजीनगर: उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना कोणी विचारत नाही, यामुळे त्यांनी आता नातवंडे सांभाळावी, तर अंबादास दानवे हे कागदोपत्री नेता आहे, या दोघांनी जिल्ह्याची वाट लावली, अशा शब्दात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्यावर रविवारी निशाणा साधला.
मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भुमरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांना का महत्व द्यायचे. हे स्वत: म्हणतात, मला कोणी विचारत नाही, माझं कोणी एकेत नाही. जनतेने त्यांना फार डोक्यावर घेतले होते. आता त्यांना कोणी विचारत नाही, हे खरे आहे. त्यांनी आता घरी बसून नातवंडे सांभाळावी. अंबादासने स्वत: केलेले काम दाखवावे असे नमूद करीत अंबादासचे प्रॅक्टीकल काहीच काम नाही. ते फक्त कागदोपत्री नेता असल्याची टीका खा. भुमरे यांनी केली. ते म्हणाले की, जिल्ह्याची लोकसभा गेली, सगळी विधानसभा गेली आता मनपा आणि जिल्हा परिषदही जाईल. उद्धवसेनेकडे काहीच राहणार नाही. या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याची वाट लावल्याचे भुमरे यांनी सांगितले.
खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही. हे दोघेच भांडू लागली आहेत. यामुळे येथे हे दोघेच राहणार आहेत. वरीही ते दोघेच (उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे )बापलेक पक्षात राहणार असल्याचे भुमरे म्हणाले. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पक्षप्रवेशासाठी रोज गर्दी होत आहे. उद्धवसेनेकडे माणसेच राहिले नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भुमरे यांनी एमएलडी पाणी किती सांगावे; अंबादास दानवे यांचे खा.भुमरे यांना उत्तर
मला कागदीनेता म्हणणाऱ्या खासदार संदीपान भुमरे यांनीध एमएलडी पाणी किती असते हे सांगावे, मेरी संस्थेचा पाण्यासंबंधी मराठवाडा विरोधी अहवाल त्यांनी वाचला का? असा सवाल करीत त्यांना केवळ गुत्तेदारी करणे एवढेच माहिती आहे, असे खोचक प्रत्यूत्तर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी दिले.
तापडिया नाट्य मंदीर येथे पत्रकारांनी भुमरे यांनी केलेल्या टीकेकडे आ.दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी शहराच्या पाणी प्रश्नांवर सरकारविरोधात संघटन उभे करीत आहे. शहराचा पाणी प्रश्न कागदावर आहे का, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत उद्धवसेनेच्या पराभव झाल्याची टीका भुमरे यांनी केली होती. याकडे लक्ष वेधले असता आ.दानवे म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये सत्तेचा दुरुपयोग करुन आणि भ्रष्टाचाराचा पैसा वापर केल्याने आम्हाला सत्ता मिळाली नाही, असे नमूद केले.