वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत

By बापू सोळुंके | Published: May 11, 2024 08:18 PM2024-05-11T20:18:59+5:302024-05-11T20:20:25+5:30

शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविणारा आणि तर महागाईवर आवाज उठविणारा खासदार आम्हाला हवा असल्याचे मत, महिलांनी व्यक्त केले.

Chhatrapati Sambhajinagar MP Wants To Solve Rising Inflation Water Issue, Voted By Women | वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत

वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडण्यासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सिडको एन ४ येथे आयोजित केलेल्या ''''चाय पे चर्चा'''' उपक्रमात सहभागी महिला नवा खासदार कसा हवा, यावर व्यक्त झाल्या. बहुतेक महिलांनी त्यांच्या मुलांना नोकरीच्या शोधात पुणे, मुंबईसह परप्रांतात जावे लागते. यामुळे येथील डीएमआयसीमध्ये नवीन उद्योग खेचून आणणारा खासदार हवा असल्याचे सांगितले. आयआयटी, आयआयएम, एम्स सारख्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्था शहरात आणण्यासाठी प्रयत्न करणारा खासदार गरजेचा असल्याचे नमूद केले. शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविणारा आणि तर महागाईवर आवाज उठविणारा खासदार आम्हाला हवा असल्याचे मत, व्यक्त केले. काय म्हणाल्या महिला?

राष्ट्रीय शैक्षणिक संस्था हव्या
आजवरच्या खासदारांनी शहरासाठी केंद्रातील कोणती मोठी संस्था येथे आणली? आयआयटी, आयआयएम आणि एम्स सारख्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्था येथे आणण्यासाठी भांडणारा खासदार आम्हाला हवा आहे. येथे चांगल्या शैक्षणिक संस्था नसल्याने येथील पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या शहरात पाठवावे लागते. बऱ्याचदा त्याचा खर्च त्यांना परवडत नाही.
- डॉ. मनीषा मराठे. सामाजिक कार्यकर्त्या.

बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहे
एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग खेचून आणणाऱ्या खासदारांची गरज आम्हाला आहे. कारण येथे आयटी हब नाही. आयटी उद्योग येथे असते तर येथील इंजिनिअर्संना पुणे, मुंबई, बेंगळुरू सारख्या शहरात नोकरीसाठी जावे लागले नसते. डीएमआयसी असूनही तेथे एकही मोठा उद्योग आला नाही, याची खंत वाटते. परिणामी मतदारसंघातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. 
- दीपाली जाधव. ब्युटिशिअन. 

अंकुश ठेवणारा खासदार हवा
शहर नुसतेच आकाराने मोठे झाले आहे. येथे आधी रस्ता तयार केला जातो, नंतर ड्रेनेजसाठी रस्ता खोदला जातो, याचा जनतेला मोठा त्रास होतो. अशाप्रकारे ढिसाळ कारभारावर अंकुश ठेवणारा खासदार हवा आहे.
- सविता मराठे, गृहिणी.

पिण्याच्या पाण्याचा सोडवा
शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मागील २५ वर्षांपासून प्रश्न जैसे थे आहे. पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविणारा खासदार हवा आहे. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मूकमोर्चा काढला. मात्र केंद्राने समाजाची दखल घेतली नाही. मराठा आरक्षणावर संसदेत आवाज उठविणारा खासदार हवा आहे.
- कल्पना साखळे, सामाजिक कार्यकर्त्या.

महागाईने सामान्य जनता त्रस्त
शेती मालाला हमी भाव मिळत नाही, म्हणून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या अधिक होत आहे. खते, बियाणे यावरील जीएसटी रद्द करून त्यांना दिलासा देणारा खासदार हवा आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. 
- दीपाली पिंगळे, गृहिणी.

महिलांचे आर्थिक गणितच बिघडले 
दहा वर्षांपूर्वी गॅस सिलिंडरचे दर ३०० रुपये होते. आज तीनपट दर वाढले आहे. यासोबतच प्रत्येक वस्तूवर जीएसटी द्यावा लागतो. यामुळे महिलांचे आर्थिक गणितच बिघडले आहे. वाढत्या महागाईवर आवाज उठविणारा तसेच शहरात रोजगार उपलब्ध करणारा खासदार आम्हाला हवा आहे.
- स्वाती शिंदे, नोकरदार महिला

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या.- २० लाख ३५ हजार २३
महिला मतदारांची संख्या- ९ लाख ८१ हजार ७७३
 

Web Title: Chhatrapati Sambhajinagar MP Wants To Solve Rising Inflation Water Issue, Voted By Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.