शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गृहप्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका देणार जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 07:17 PM2024-09-07T19:17:04+5:302024-09-07T19:19:01+5:30
बांधकाम व्यावसायिकाने प्रकल्प उभारून द्यावा. त्यासाठी लागणारा खर्च कर्मचाऱ्यांनी कर्जाच्या माध्यमातून द्यावा, असे ठरले.
छत्रपती संभाजीनगर : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेचे दोन हजारांहून अधिक कर्मचारी पहाटे ४ वाजेपासून परिश्रम घेतात. त्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना हक्काचे घर नाही. आजही हे कर्मचारी विविध स्लममध्ये राहत आहेत. त्यांना चांगल्या ठिकाणी घर मिळावे, यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
मनपा कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने दिल्ली गेट, भडकल गेट, जकात नाका, सेव्हन हिल आदी ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात निवासस्थाने उभारली आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. शिवाय अनेक स्वच्छता कर्मचारी गांधीनगर, हर्षनगर, लेबर कॉलनी, शहाबाजार, शताब्दीनगर, आंबेडकरनगर, घाटी परिसरात राहतात. स्वत:चे घर नसल्याने हे कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात. त्यांना चांगले हक्काचे घर मिळावे, यासाठी मनपा अधिकारी-कर्मचारी संघटनेने मागील आठवड्यात प्रशासकांकडे मागणी केली. याची दखल घेत प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेतला. गुरुवारी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सहसंचालक मनोज गर्जे यांना या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सूचना केली. मनपाला बांधकाम परवानगी देताना काही जागा ॲमिनिटीअंतर्गत प्राप्त होते, अशा जागांचा शोध घेऊन तेथे गृहप्रकल्प राबविण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश दिले.
बांधकाम व्यावसायिक प्रकल्प उभारून देणार
सफाई कामगार म्हणून किती कर्मचाऱ्यांना स्वत:ची घरे नाहीत, हे अगोदर तपासण्यात येईल. एकूण कर्मचारी किती, ज्यांना घरांची गरज आहे, हे निश्चित झाल्यावर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. गृहप्रकल्पासाठी जागा मनपाची राहील. बांधकाम व्यावसायिकाने प्रकल्प उभारून द्यावा. त्यासाठी लागणारा खर्च कर्मचाऱ्यांनी कर्जाच्या माध्यमातून द्यावा, असे ठरले.
२००५ मध्ये राबविली होती योजना
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी सातारा येथे दीड एकर जागेवर ६२ कर्मचाऱ्यांसाठी गृहप्रकल्प राबविला होता. अवघ्या अडीच लाख रुपयांना कर्मचाऱ्यांना घरे देण्यात आली होती. एका खासगी बँकेकडून कर्ज दिले होते. आज या रो-हाऊसची किंमत १५ ते १८ लाख झाली. काही कर्मचाऱ्यांनी आज त्याच जागेवर दोन ते तीन मजले बांधले आहेत.