शरद पवार यांना बदलेलं छत्रपती संभाजीनगर नाव मान्य नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 06:55 PM2023-06-30T18:55:40+5:302023-06-30T19:10:00+5:30
तुम्ही कितीही औंरगाबाद म्हंटले तरी आमच्या हृदयातून छत्रपती संभाजी महाराजांना कोणीही काढू शकत नाही.
गंगापूर (छत्रपती संभाजीनगर ) : एक वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या आमच्या सरकारने औंरगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचे पहिलं काम केले. मात्र, शरद पवार यांना हे मान्य नसून ते म्हणतात तुम्ही नाव काही करा मी औंरगाबादच म्हणेल; म्हणजे पवारांना छत्रपती संभाजीनगर झालेले नामांतर मान्य नसल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे जल जीवन मिशन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पवारांना उद्देशून बोलतांना फडणवीस पुढे म्हणाले की, तुम्ही कितीही औंरगाबाद म्हंटले तरी आमच्या हृदयातून छत्रपती संभाजी महाराजांना कोणीही काढू शकत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही. एक वर्षांपूर्वी जनतेच्या आशीर्वादाने सरकार बदलले व पुन्हा एकदा सर्व सामान्य व शेतकऱ्यांचे सरकार राज्याच्या सत्तेत आले. या एक वर्षभरात अनेक विकास काम झाल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
देशात सुबत्ता आणण्याचे काम मोदी सरकारने केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांतील कार्यकाळात विकासात्मक योजनांमधून देशात सुबत्ता आली असून सर्व सामान्य जनतेचे यामुळे कल्याण झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली आहे. शेतकऱ्यांनाही वर्षाला सहा हजार रुपये किसान योजनेतून देऊन सरकारने पाठबळ दिले आहे. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली असून लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले.