छत्रपती संभाजीनगरवासीयांना आवडते भेंडी; दररोज फस्त करतात ५० क्विंटल भाजी
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 23, 2024 04:56 PM2024-05-23T16:56:09+5:302024-05-23T16:57:50+5:30
छत्रपती संभाजीनगरात सध्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून दररोज ४० ते ६० क्विंटल भेंडीची आवक होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : पालेभाज्यांमध्ये ‘मेथी’ची भाजी सर्वाधिक विक्री होते, तसेच फळभाज्यांमध्ये ‘भेंडी’ची भाजी वर्षभर विकली जाते. कारण, शहरवासीय दररोज ५० क्विंटल भेंडीची भाजी फस्त करतात. एरव्ही लहान मुले भाजी खाण्यास नकार देतात; पण भेंडीची भाजी म्हटल्यावर जेवणासाठी चटकन तयार होतात. एवढेच नव्हे तर, शाळेत डब्बा घेऊन जातात तेव्हा बहुतांश विद्यार्थ्यांच्या डब्यात भेंडीची भाजी असतेच. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष ‘जून’मध्ये सुरू होईल तेव्हा भेंडीला अधिक मागणी वाढणार आहे.
इंग्रजीत लेडी फिंगर
मराठी, हिंदी भाषेत ‘भेंडी’ची भाजी म्हटले जात असले तरी इंग्रजीत या भाजीला ‘लेडी फिंगर’ असे म्हटले जाते. कारण, बोटाच्या आकारासारखी ही भेंडी असल्याने तिला तसे म्हटले जाते.
कोणत्या जिल्ह्यातून येते भेंडी?
महाराष्ट्रात ६००० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भेंडीची लागवड केली जाते. तशी बहुतांश जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमी-अधिक प्रमाणात केली जाते. त्यात पुणे, जळगाव, धुळे, अहमदनगर, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यांत लागवड मोठ्या प्रमाणात होते. छत्रपती संभाजीनगरात सध्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून दररोज ४० ते ६० क्विंटल भेंडीची आवक होत आहे.
भेंडीचे भाव वाढले
ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व अतिउष्णता याचा परिणाम भेंडीच्या पिकावर होत आहे. परिणामी, ६० रुपये किलोने विक्री होणारी भेंडी मागील आठवड्यापासून ८० रुपये किलोने विकत आहे. भेंडी महाग झाली तरी उलाढालीवर परिणाम होत नाही.
- संजय वाघमारे,भाजी विक्रेता
मधुमेहींसाठी आवर्जून खरेदी करतात भेंडी
आबालवृद्ध भेंडीची भाजी आवडीने खातात; पण मधुमेहींसाठीही भेेंडी लाभदायक असल्याने तिची विक्री वाढण्याचे हे मोठे कारण आहे. भेंडीत लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही खनिजे असतात जी हाडे, हृदय मजबूत ठेवण्यास फायदेशीर असतात आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. उच्च प्रमाणात विरघळणारे फायबर जे रक्तातील शर्करा नियंत्रित करते, कोलेस्टेरॉल कमी करते. यामुळे मधुमेहींसाठी ही भाजी लाभदायक असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.